पुणे/शिक्रापूर- भरधाव कंटेनरच्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. हा भीषण अपघात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर मध्ये झाला आहे. या अपघातात 3 वर्षाची चिमुकली थोडक्यात बचावली ती गंभीर जखमी आहे. या अपघातात चिमुकलीच्या डोळ्यादेखत तिचे आई-वडिल व धाकट्या बहिणीने प्राण सोडले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अशोक दगडू पवार (वय-45), सारीका अशोक पवार (वय-40) आणि अनु अशोक पवार (वय- 7 महिने) असं अपघातात मृत झालेल्यांची नावे तर शुभ्रा अशोक पवार 3 वर्षीय जखमी चिमुकलीचे नाव आहे. कंटेनर चालकास पोलिसांनी अटक केली आहे.
मृत अशोक पवार आपली पत्नी आणि दोन मुलींना घेऊन शिक्रापूर चाकण रस्त्याने जात होते. दरम्यान जातेगाव फाटा येथून जात असताना त्यांना एक फोन आला. यामुळे पवार यांनी रस्त्याच्या कडेला एका हॉटेलसमोर आपली दुचाकी थांबवली आणि फोनवर बोलू लागले.
दरम्यान पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीसह संपूर्ण पवार कुटुंब कंटेनरखाली चिरडले गेले. सुदैवाने 3 वर्षाची चिमुकली यातून थोडक्यात बचावली.
स्थानिकांनी कंटेनर चालकास पकडले व शिक्रापूर पोलिसास अपघाताची माहिती दिली. बालाजी संजय येलगटे असं आरोपी कंटेनर चालकाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.