कल्याणी फडके
पुणे – “खड्डेमय’ झालेल्या रस्त्यांवर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर महापालिकेने शहरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. मात्र, खड्डे बुजवताना केवळ डांबरीकरणाचे पॅच लावल्याचे दिसत आहे. महापालिकेने तंत्रशुद्ध पद्धतीने खड्डे न बुजवल्याने त्याठिकाणी स्पीडब्रेकर तयार झाल्याची भावना वाहनचालक व्यक्त करतात.
पावसामुळे शहरातील रस्त्याची चाळण झाली होती. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना “स्मार्ट’ पुण्यात “खडखडाट’ अनुभवायला मिळत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत दै. “प्रभात’ने सातत्याने वृत्त प्रकाशित केले होते.
शहरातील खड्डे बुजवण्यात येणार असल्याने वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र, टिळक रस्त्यासारख्या अनेक रस्त्यांवर तंत्रशुद्ध पद्धतीने खड्डे न बुजवल्याने नागरिकांना पुन्हा त्रासच सहन करावा लागत आहे. खड्डे बुजवल्यानंतर रस्ते व्यवस्थित समान केले नसल्याने “अघोषित स्पीडब्रेकर’च तयार झाल्याचे चित्र आहे. याशिवाय बुजवलेल्या खड्ड्याच्या बाजूने खडीदेखील रस्त्यावर पसरल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
याशिवाय, अशा रस्त्यांवर अपघाताचा धोका संभवतो. रस्त्यावरील खड्ड्यांबरोबरच उंचवटा आणि खडीमुळे वाहन घसरण्याची शक्यता असते. याशिवाय, खड्डे किंवा उंचवट्याचा वाहनचालकाला प्रामुख्याने दुचाकीचालकाला अंदाज न आल्यास गचका बसून पाठीचे दुखणे उद्भवण्याची शक्यता असते.
शहरात असमान रस्ते आणि रस्त्यावरील खडीमुळे प्राणांतिक अपघात झाल्याचीदेखील नोंद आहे. टिळक रस्त्यासारख्या वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे होते. मात्र, ते मागील काही दिवसांमध्ये बुजवत आहेत. तरीदेखील वाहन चालविताना कसरत करावी लागत असल्याचे वाहनचालक सांगतात.