नवी दिल्ली – ओमायक्रॉन विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील जनतेला करोना लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया वेगवान पद्धतीने राबवावी आणि ज्यांना दोन्ही डोस देऊन झाले आहेत त्यांच्यासाठी बुस्टर डोसचा विचार करावा अशी सुचना देशातील आरोग्य वैज्ञानिकांनी सरकारला केली आहे.
काही देशांनी आता बुस्टर डोस देण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. भारतात मात्र लोकसंख्या मोठी असल्याने येथे मुळचे लसीकरण करणे ही जिकीरीची बाब आहे. अजून अनेकांना करोना लसीचा दुसरा डोसही मिळू शकलेला नाही.
या वर्गाला संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी त्यांना दुसरा डोस देण्याची प्रक्रिया वेगाने पुर्ण केली पाहिजे असे या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. 28 प्रयोगशाळांच्या संघटनेने 40 वर्षांवरील सर्वांना बुस्टर डोस देण्याची शिफारस केली आहे त्याचा विचार केला गेला पाहिजे असेही त्यांचे म्हणणे आहे.
ईम्युनॉलॉजिस्ट विनीता बाळ यांनी पीटीआयला सांगितले की देशातील 18 वर्षाखालील वयोगट अजूनही लसींपासून वंचित आहे. त्यांच्या लसीकरणाचाही विचार केला गेला पाहिजे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इम्युनॉलॉजिचे सत्यजीत रथ म्हणाले की, बुस्टर डोस देण्याची खरेच गरज आहे काय याचा अजून पुरेसा अभ्यास जगात झालेला नाही.