पालखी प्रस्थान सोहळा पूर्वतयारीला वेग ! वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासकीय बैठकांचे सत्र सुरू

आळंदी (एम. डी. पाखरे/ज्ञानेश्वर फड) -संपदा सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा।। जावे पंढरीसी आवडे मनासी । कधी एकादशी आषाढी हे ।। वारकऱ्यांना आता पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेध लागले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा अवघ्या 12 दिवसांवर आला आहे. यावर्षी प्रस्थान सोहळ्याला दोन लाखांपेक्षा आधिक भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, माऊली देवस्थान कमिटी यांचे बैठकांचे सत्र सुरू असून प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा देण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.
येत्या 11 जूनला सायंकाळी 4 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. तर 29 जूनला आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे. वारी प्रस्थान सोहळ्यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी येथे किमान तीन ते चार दिवस 2 लाखांपेक्षा अधिक भाविक वास्तव्याला असतात. यावेळी भाविकांना सर्व सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनाच्या तयारीला आता वेग आला आहे. 24 तास पाणी, वीज, आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे.
नुकतेच बुधवारी (दि. 24) माऊली संस्थान भक्त निवासमध्ये दिंडी मालक, संस्थान कमिटी, पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी दिंडीकऱ्यांच्या समस्या यावर चर्चा करण्यात आली. तसेच मागील वर्षी पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी माऊली मंदिरात जास्त वारकरी आल्याने गर्दी होऊन परिणामी प्रस्थान सोहळ्यास नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ लागला. त्यामुळे यावर्षी तसा प्रकार घडू नये यासाठी किती वारकरी मंदिरात असतावे यावरही चर्चा करण्यात आली.
रथाची देखभाल दुरूस्ती
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ज्या रथातून पंढरपूरला नेली जाते. त्या चांदीच्या रथाची डागडुजी, रंगकाम, पॉलिश, आदी कामे आता अंतीम टप्प्यात आली आहेत. येत्या 4 ते 5 दिवसांत रथाची ट्रायल घेतली जाणार आहे. तसेच चकाकी देण्यात येणार असल्याचे माऊली संस्थानचे कर्मचारी बापू लवंगे यांनी सांगितले. तसेच सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांना दैनंदिन नित्योपचार केले जातात. अभिषेक, नैवेद्य, आरती यांसाठी लागणारे साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने शहरात आवश्यक ठिकाणी 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 3 जूनपासून अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात येणार आहे. भाविकांना स्वच्छ पाण्यात अंघोळ करता यावी यासाठी सोहळ्यादरम्यान इंद्रायणीत अधिकचे पाणी सोडण्यास संबंधित विभागाला सूचना देण्यात आली आहे. 1500 मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी कर्मचारी 24 तास तैनात असणार आहेत.
– कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, आळंदी





