मुंबई – मुंबई-अहमदाबादला जोडणाऱ्या देशातील पहिल्या हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्पातंर्गत लार्सन ऍण्ड टुब्रोला 2500 कोटी रुपयाचे मोठे कंत्राट मिळाले आहे. लार्सन ऍण्ड टुब्रो पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. त्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान होणार आहे.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्पाची अमलबजावणी करणार आहे. हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्प जपानी इ 5 शिंकानसेन टेक्नोलॉजीवर आधारीत आहे. बुलेट ट्रेन हा मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. ते जपानच्या सहकाऱ्याने हा प्रकल्प तडीस नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालिन पंतप्रधान शिंझो अबे यांच्या उपस्थितीत सप्टेंबर 2017 मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. हा 508 किलोमीटरचा मार्ग आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सुरु झाल्यानंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून 90 हजार पेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होऊ शकतात. प्रतितास 300 किमी पेक्षा जास्त वेग गाठवण्याचा या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उद्देश आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रन व्यतिरिक्त दिल्ली-अहमदाबाद, दिल्ली-अमृतसर, वाराणसी-हावडा, दिल्ली-वाराणासी, मुंबई-हैदराबाद, मुंबई-नागपूर, चेन्नई-मैसोर दरम्यान हायस्पीड रेल कॉरिडोरची व्यवहार्यता तपासण्याला मंजुरी देण्यात आली आहे.