पुणे – शहरात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी सरसकट लसीकरण होणे आवश्यक असून त्यासाठी राज्यशासन व केंद्रशासनाच्या समन्वयातून लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली.
तर शहरात शासकीय आणि खासगी अशी 900 रुग्णालये असून या सर्व ठिकाणी लसीकरण सुरू झाल्यास दिवसाला 30 हजार पुणेकरांना लस देणे शक्य होईल तसेच शहरातील लसीकरण अवघ्या 2 महिन्यात होईल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
शहरात लसींचा अपुरा पुरवठा असल्याने तसेच दोन वेगवेगळ्या लस असल्याने लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे. त्यातच, दुसऱ्या बाजूला दिवसेंदिवस करोना रुग्णांचा आकडा लक्षणीय स्वरूपात वाढत आहे. याबाबत बोलताना महापौरांनी पुण्यातील रुग्णसंख्या वाढत चालली आहे. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. लोकसंख्या जास्त असल्याने रुग्णांची संख्याही अधिक दिसते आहे. शहरात करोना रुग्णांसाठी 4 हजार 200 खाटा उपलब्ध आहेत.
यातील 2 हजार 200 खाटा रिकाम्या असून उर्वरित दोन हजार खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. संसर्गाचा वेग अधिक असला तरी त्याची तीव्रता कमी आहे. नागरिकांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. गृह विलगीकरणामध्ये राहून उपचार घेण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. आवश्यकता वाटल्यास यापूर्वी करार केलेल्या खासगी रुग्णालयांसोबतचे करार पुन्हा वाढविण्यात येतील असेही महापौर यावेळी बोलताना म्हणाले.