आयुक्त डॉ. म्हैसेकर : रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती द्या
बारामती – पुणे विभागात रेल्वेने बारामती-फलटण-लोणंद ब्रॉडगेज नवीन लाईन, पुणे-मिरज ब्रॉडगेज दुहेरी रेल्वेलाइन, कराड रेल्वेलाइन आदी प्रकल्प हाती घेतले आहे. त्यासाठी जमीन आवश्यक असून रेल्वेच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी, त्यासाठी गावनिहाय शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पुणे विभागातील रेल्वेमार्ग भूसंपादनाबाबत आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, रेल्वेच्या पुणे विभागाचे उपमुख्य अभियंता सचिन पाटील, मिरज विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी, अभियंता विकास कुमार, सोलापूरचे भूसंपादन अधिकारी हेमंत निकम, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप, कराडचे प्रांताधिकारी उत्तम डिगले, कोरेगावच्या प्रांताधिकारी किर्ती नलावडे, उपजिल्हाधिकारी सुरेखा माने आदी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले की, पुणे विभागातील रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा रेल्वे मंत्र्यांनी घेतला असून ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. रेल्वेमार्गासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाच्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. रेल्वेमार्गासाठी नेमक्या किती जमिनीची आवश्यकता आहे, त्यासाठी किती शेतकऱ्यांच्या जमिनी जातात, याचा आराखडा तयार करावा. तसेच, ज्या ठिकाणी रेल्वेमार्गावर अंडर पास अथवा जोड रस्त्यांची आवश्यकता आहे, त्याचीही माहिती तयार करण्यात यावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.