मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 9 सप्टेंबर 2021 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता, तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सूचना केली होती. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे.
पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, कीर्तन, प्रवचन, तत्त्वज्ञान आदी बाबींशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यासाठी संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडे 5 वर्षांसाठी किंवा पुढील आदेश होईलपर्यंत जे लवकर होईल, त्या काळासाठी सोपवण्याचा निर्णय काही अटींच्या अधीन राहून घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना आवश्यक त्या प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागेल. निरनिराळ्या संप्रदायांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास घटकांची निवड करून अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात येईल. संतपीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येक संप्रदायाच्या अभ्यासक्रमांना योग्य ते स्थान देण्यात येणार आहे.
तसेच अभ्यासक्रम चालवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आवश्यकतेनुसार तज्ज्ञ व्यक्तींची मानधन किंवा तासिका तत्त्वावर तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपात बाह्यस्रोतामार्फत करता येऊ शकेल.
यासाठीचा खर्च विद्यापीठाला स्वनिधीतून करावा लागणार असून, संतपीठाच्या जागेची तसेच इमारतीची मालकी शासनाकडेच राहील. फक्त शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी ही इमारत विद्यापीठाकडे सोपविण्यात आली आहे.