पुणे -पुणे शहरापेक्षा आता ग्रामीणमध्ये करोनाबाधित दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाधित सापडल्यानंतर त्या बाधित क्षेत्रात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे आवश्यक आहे. परंतू, जिल्ह्यात आंबेगाव, दौंड, हवेली, जुन्नर आणि शिरूर या पाच तालुक्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा वेग मंदावला आहे. येथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण प्रत्येकी 10 टक्के असून, या तालुक्यांना अधिक काम करण्याची गरज असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी दिली.
जिल्ह्यातील करोना आढावा संदर्भात त्यांनी गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके उपस्थित होते. पानसरे म्हणाल्या, एकूण जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण 12.5 टक्के इतके आहे. तर इंदापूर, खेड, पुरंदर, वेल्हा, मावळ, मुळशी तालुक्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम चांगले झाले आहे.
दरम्यान, दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य विभागाकडून करोना साखळी ब्रेक करण्यासाठी सुपर स्प्रेडर सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये 6 हजार 5 बाधित सापडले. जिल्ह्यातील सीएसआरच्या माध्यमातून 53 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मिळाले आहेत. तर जिल्हा नियोजन समितीकडून दहा प्रस्तावित आहेत.