पदवीधर मतदारसंघासाठी मोर्चेबांधणीला वेग

मतदार नोंदणीकडे पदवीधरांची पाठ; उरले केवळ तीनच दिवस

पिंपरी – पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार कोण? याची चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादीनेही या मतदारसंघात कंबर कसण्यास सुरू केली आहे. पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर असे या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असून, भाजपा आणि राष्ट्रवादीच्याच उमेदवारामध्ये सरळ लढत होणार आहे. मनोबल वाढलेल्या राष्ट्रवादीने या मतदारसंघासाठी आतापासूनच तयारी सुरू केल्यामुळे या मतदारसंघात तुल्यबळ लढत होण्याची शक्‍यता आहे.

पुणे जिल्हा पदवीधर मतदारसंघासाठी जून महिन्यात निवडणूक होणार आहे. या मतदारसंघाचे नेतृत्त्व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे करीत होते. गतवेळी झालेल्या निवडणुकीत पाटील हे केवळ 2 हजार 380 इतक्‍या कमी मताधिक्‍याने विजयी झाले होते. नुकतेच साताऱ्यातून खासदार झालेल्या श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना तुल्यबळ लढत दिली होती. तात्कालीन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बंडखोराने 30 हजारांच्या आसपास मतदान घेतले होते. आता चंद्रकांत पाटील हे विधानसभेत निवडून गेल्यामुळे भाजपाचा उमेदवार त्यांच्याऐवजी कोण? अशी चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादीही कोणाला संधी देणार यावर चर्चा झडू लागल्या आहेत.

निवडणूक आयोगाने मतदार यादी अपडेट करण्यासाठी जुनी मतदार नोंदणी रद्द करून नव्याने नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या मतदारसंघात गतवेळी सुमारे चार लाखांच्या आसपास नोंदणी होती. सध्या मतदारसंघात पाच लाखांहून अधिक पदवीधर आहेत. मात्र नव्या मतदार नोंदणीकडे पदवीधरांनी पाठ फिरविल्यामुळे मतदार नोंदणी अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यातच निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची प्रक्रिया किचकट बनविल्यामुळे नोंदणी करण्यासाठी पदवीधरच अनुत्सुक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणी केली असली तरी नोंदणी होण्यावरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

पिंपरी-चिंचवड मतदार नोंदणीच्या कालावधीत आतापर्यंत केवळ 15 जणांनी नोंदणी केली आहे. नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक आणि त्यांनतर आलेला दिवाळीचा सण तसेच निवडणूक आयोगाची किचकट पद्धत यामुळे मतदार नोंदणीला वेग आलेला नाही. त्यातच आता नोंदणीसाठी केवळ 3 दिवस शिल्लक राहिल्यामुळे मतदार नोंदणी किती होणार हा खरा प्रश्‍न आहे. कितीही प्रयत्न केले तरी संपूर्ण मतदारसंघातील नोंदणी एक लाखापेक्षा अधिक होण्याची शक्‍यता मावळली आहे. तरीही राजकीय जाणकारांचे मतदार नोंदणीकडे लक्ष लागून राहिले आहे.

पराभवाचे उट्टे काढणार का?
गतवेळी अत्यंत कमी मतांनी पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला असला तरी एकगठ्ठा मतदार नोंदणी होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. पक्षाच्या विचाराचे अधिकाधिक मतदार जो पक्ष नोंदविली त्याचा विजय होणार हे निश्‍चित असल्यामुळे राष्ट्रवादी मतदार नोंदणी करून पराभवाचे उट्टे काढणार की भाजपाचाच उमेदवार पुन्हा एकदा विजयी होणार हे जून महिन्यातच स्पष्ट होणार आहे.

उमेदवार कोण? यावर रंगतेय चर्चा
राष्ट्रवादीकडून गतवेळी थोड्या मतांनी पराभूत झालेले सारंग पाटील हे पुन्हा एकदा तयारी लागले आहेत. तर चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्यामुळे याच जिल्ह्यातील उमेदवार द्यावा, असा प्रवाह पक्षात आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूडमधून माघार घेतलेल्या मेघा कुलकर्णी यांच्यासह सहकार संघाचे अध्यक्ष शेखर चरेगावकर व माणिक पाटील-चुयेकर यांची नावे चर्चेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.