युतीच्या काळात मागासवर्गीयांच्या विकासाला गती – गिरीश बापट

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरी

पुणे – “मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला युतीच्या शासन काळात खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेतून समाजाच्या शेवटच्या स्तरावरील व्यक्तिपर्यंत विकासाच्या योजना पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा दावा पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी केला.

बापट यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर बाजार येथे प्रचार फेरीला प्रारंभ झाला. ट्रायलक चौक, गुडलक चौक, भोपळे चौक, बाबाजान दर्गा चौक, सेंट्रल स्ट्रीट, दस्तुर मेहर रोड, गवळीवाडा येथे समारोप झाला. याप्रसंगी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आरपीआय (ए)चे शहराध्यक्ष अशोक कांबळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी, नगरसेवक उमेश गायकवाड, विवेक यादव, दिलीप गिरमकर, अतुल गायकवाड, डॉ. किरण मंत्री, संतोष इंदूरकर, अतुल गोणकर, संजय मोरे, किशोर संघवी, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे यांनी सहभाग घेतला.

बापट पुढे म्हणाले, “स्वयंरोजगारासाठी युवकांना मुद्रा कर्ज, मेक इन इंडियातून सव्वा लाख युवकांना उद्योजक होण्याची संधी, उद्योगधंदे उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांना संशोधनासाठी 20 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज सुविधा, ह्दय, कॅन्सर अशा गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तीन लाख रुपयांपर्यंत मदत, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी जिल्हानिहाय समित्या, वाल्मिकी-मेहतर समाजाप्रमाणे अनुसूचित जातीतील कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये वारसा हक्क, नोकरदार महिलांसाठी 50 तालुक्‍यांमध्ये वसतिगृह आदी काही महत्त्वाचे निर्णय घेऊन मागासवर्गीयांच्या विकासाला चालना दिली.’

जनतेला विकास “डोळ्यांनी’ दिसतो
पुणे आणि पीएमआरडीए मेट्रो अंतर्गत सुमारे 20 हजार कोटीची कामे, जायका, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महामार्गाची मिळून 20 हजार कोटीहून अधिक कामे गेल्या केवळ 5 वर्षात सुरू झाली. तर काही कामे लवकरच सुरू होतील. हा विकास जनतेला “डोळ्यांनी’ दिसत असला, तरी काहींना मात्र आकड्यांचीच भाषा कळते, अशा भाषेत महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी विरोधकांना टोला लगावला. पुणे मेट्रोची 11,420 कोटींची तर पीएमआरडीए मेट्रो 8,113 कोटी रुपयांची कामे सुरू झाली. नदी सुधारणेच्या जायका प्रकल्पासही मान्यता मिळून त्यासाठी 980 कोटी मंजूर करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 4,768 कोटींच्या कामांना गती प्राप्त झाली, तर राष्ट्रीय महामार्गाची सुमारे 16 हजार कोटींहून अधिक कामे मार्गी लागली. पालखी मार्गासाठी सुमारे 9 हजार कोटींहून अधिक निधी, पीएमआरडीए अंतर्गत 128 किमीच्या रिंगरोडसाठी 17 हजार कोटी रुपये मंजूर झाल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.