जिहे कटापुर योजनेला शिवसेनेमुळेच गती ; प्रताप जाधव

पुसेगाव – जिहे कठापूर योजनेच्या कामला शिवसेनेमुळे गती मिळाली असून पालकमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी केंद्रीय जल समितीच्या पुढे जिहे कटापूर योजनेची वस्तुस्थिती मांडून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली. योगायोगाने नितीन बानुगडे पाटील यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाले व कामाला गती प्राप्त झाली. याचेच फलित म्हणून जिहे कटापूर योजनेचे पाणी सप्टेंबरअखेर नेर तलावात पडेल. शिवसेनाप्रमुखांनी दुष्काळी भागाला दिलेला शब्द पूर्ण होत असल्याने शेतकरी समाधानी असून योजनेचे पाणी पूजन पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांच्या हस्ते करू, असा दावा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांनी केला.

शिवसेनेच्या वतीने जिहे- कठापूर येथील कामाची नुकतीच पाहणी करण्यात आली. यावेळी प्रताप जाधव यांच्यासह कोरेगाव तालुक्‍याचे माजी तालुका प्रमुख बाळासाहेब फाळके, खटाव तालुका प्रमुख दिनेश देवकर, कोरेगाव तालुका प्रमुख सचिन झांझुर्णे, उपतालुकाप्रमुख संजय केंजळे, उपतालुकाप्रमुख ऋषिकेश गवळी, कोरेगाव शहर प्रमुख अक्षय बर्गे, महिपती नाना डंगारे, आमिन आगा, रागु जाधव, ज्योतीराम गवळी, गणेश यादव, रवी फाळके, तालुका संघटक यशवंत जाधव, अस्लम शिकलगार, कोरेगाव खटावमधील बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते. श्री. जाधव म्हणाले, “”शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती केली.

जिहे कठापूर योजनेचे काम 1999 मध्ये 80 टक्के पूर्ण झाले. मात्र 1999 ला सत्ता गेली व योजनेला ग्रहण लागलं. आघाडी सरकारने या योजनेवर निधी उपलब्ध केला नाही. 1999 पासून 20 टक्के राहिलेले काम आघाडी सरकारला पूर्ण करता आले नाही. कामाच्या पाठपुराव्यासाठी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको, धरणे आदोलने, मंत्र्यांच्या गाड्या अडविणे, सलग पाच वेळा तालुका बंद ठेऊन निषेध व्यक्त केला.

पुसेगावमध्ये माजी उपमुख्मंत्री अजित पवार याची गाडी अडवून त्यांना जाब विचारण्याचे धाडस मी (प्रताप जाधव) केले होते. हा सर्व संघर्ष करूनही योजना पूर्णत्वास गेली नाही.” दुष्काळी कलंक पुसण्यासाठी पुन्हा शिवसेना भाजपचेच सरकार यावे लागले. योजनेच्या पूर्णत्वासाठी शिवसैनिकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांना योजनेचा कलश भेट देऊन परिस्थितीचे गांभीर्य दाखवून दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.