थंडीसाठी खास पदार्थ

गहू
खाण्यात तांदळापेक्षा गव्हाचे पदार्थ वाढावेत. गहू तांदळापेक्षा थोडे स्निग्ध आणि पचायला जड असतात. या दिवसांत गाईच्या दुधापासून तयार केलेलं साजूक तूप लावून पोळ्या खाव्यात. गव्हाच्या पिठापासून केलेले पदार्थ उदा. भरपूर तूप टाकून केलेला हलवा, बदमी हलवा, चुरमे लाडू इ. खायला हरकत नाही. साजूक तुपात केलेल्या गव्हाचा शिरा खाण्यास हरकत नाही. या गोड शिऱ्यात काजू, बदाम, बेदाणा, वेलची, अननसासारख्या फळांचे बारीक तुकडे घालून त्यातील पोषणमूल्यात वाढ करता येईल.

तिखट उपमा करताना त्यात उडीद आणि काजू घालण्यास काहीच हरकत नाही. गव्हाच्या पिठाच्या शेवया किंवा गवल्यांची खीर करावी. या शेवयांचा गोड किंवा तिखट-मिठाचा शिरा करता येतो. मोहनथाळ किंवा वड्याही सकाळी न्याहरीच्या वेळी देता येतात. भाजणीच्या चकल्या, करंज्या, शंकरपाळ्यांत गव्हाचे पीठ वापरतात. त्यामुळे हे पदार्थही या सीजनला खाण्यात असण्यात काहीच हरकत नाही. गव्हाचं पीठ तुपात भाजून त्यात काजू, शेंगदाणा कूट मिसळायचं. या मित्रणात गुळाचा एकतारी पाक मिसळावा. मिश्रण एकजीव करून लाडू वळावेत. हे लाडू आरोग्यादायी समजले जातात. बेसनच्या लाडवात गव्हाचा रवा घालून रवा-बेसन लाडू करतात. डिंकाच्या किंवा मेथीच्या लाडवात गव्हाचं पीठ वापरावं.

बाजरी
बाजरी ही गव्हाच्याच गुणधर्माची असली तरी रूक्ष आहे आणि पचायला हलकीही आहे. गव्हाबरोवर अधून मधून बाजरीचाही खाण्यात वापर करावा. या धान्यांच्या पिठाची भाकरी करतात. याचा गव्हाप्रमाणेच रवा काढून त्याची खिचडी करता येते.

बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरीची पौष्टीकता वाढवण्यासाठी यात थोडं उडदाच्या डाळीचं पीठ मिसळतात. उन्हाळ्यात ज्वारी आणि हिवाळ्यात बाजरी खावी. संक्रांतीपर्यंत तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोण्याबरोबर खाण्याची देशावर पद्धत आहे. वाढत्या वजनाची नको इतकी काळजी असणाऱ्यांनी गहू न खाता या दिवसांत बाजरीचा वापर करावा. बारीक माणसांनी या भाकऱ्या लोण्याबरोबर खाव्यात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)