मध्य रेल्वेकडून सात गाड्या तर एसटीकडून 3 हजार 724 एसटी
सोलापूर, (प्रतिनिधी) – आषाढी एकादशीनिमित्त राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. त्यांच्या सोयीसाठी मध्यरेल्वेच्यावतीने 7 विशेष रेल्वे तर राज्य परिवहन महामंडळाकडून तब्बल 3 हजार 724 बसेस धावणार आहेत.
न्यू अमरावती -पंढरपूर -न्यू अमरावती. ही रेल्वे अमरावती स्थानकावरून दुपारी दोन वाजता निघेल. पंढरपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठीची गाडी पंढरपूर स्थानकावरून दुपारी चार वाजता निघेल आणि अमरावतीला दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. गाडीला 5 स्लिपर, 8 जनरल, 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी व 2 एसएलआर असे डबे जोडण्यात आले. ही गाडी 6 ते 13 जुलैदरम्यान धावेल. पंढरपूर -कुर्डुवाडी -पंढरपूर गाडी पंढरपूर स्थानकावरून दुपारी 1 वाजता निघेल. कुर्डुवाडीला दोन वाजता पोहोचेल. तर परतणारी गाडी कुर्डुवाडी स्थानकावरून दुपारी साडेचार वाजता निघेल आणि पंढरपूरला साडेपाचच्या सुमारास पोहोचेल.
खामगाव -पंढरपूर ही गाडी खामगाव स्थानकावरून दुपारी 4 वाजून 20 मिनिटांनी निघेल आणि पंढरपूरला सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल. पंढरपूर स्थानकावरून चार वाजता निघेल. खामगावला सकाळी साडेआठ वाजता पोहोचेल. लातूर -पंढरपूर ही लातूर स्थानकावरून सकाळी सात वाजून 45 मिनिटांनी निघेल. पंढरपूरला सकाळी 12 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल. पंढरपूर स्थानकावरून दुपारी चार वाजता निघेल. लातूरला सायंकाळी सात वाजता पोहोचेल. 8 ते 16 जुलैदरम्यान ही सेवा सुरू राहील.
मिरज -पंढरपूर : मिरज स्थानकावरून पहाटे साडेपाच वाजता निघेल. पंढरपूरला सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल. पंढरपूर स्थानकावरून सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी निघेल. मिरजला दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल. ही सेवा 7 जुलै ते 15 जुलैदरम्यान सुरू राहील. मिरज -कुर्डुवाडी गाडी मिरज स्थानकावरुन दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी निघेल. कुर्डुवाडीला रात्री 8 वाजता पोहोचेल. कुर्डुवाडी स्थानकावरून रात्री साडेआठ वाजता निघेल. मिरजला रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.
एसटी बसचे नियोजन
एसटी महामंडळातर्फे नियोजित बस फेऱ्या व्यतिरिक्त सुमारे 3 हजार 724 जादा बसेस सोडण्यात येणार सुमारे 5 हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे 10 जुलै ते 16 जुलैपर्यंत कार्यरत राहतील. यंदा एसटी प्रशासनाने माईल्ड स्टाईलच्या 1200 आकर्षक बसेस धावणार आहेत. तसेच पंढरपूरकडे येणाऱ्या विविध प्रमुख मार्गावर एसटीची दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत.
जादा बसेसचे नियोजन
औरंगाबाद 1097
पुणे 1080
नाशिक 692
अमरावती 533
मुंबई 212
नागपूर 110