दिवाळी, छट पूजेसाठी पुण्याहून विशेष रेल्वे

7 गाड्यांचा समावेश; प्रवासासाठी "कन्फर्म' तिकीट असणे आवश्‍यक

पुणे – दिवाळी, छट पूजा आदी सणांचे औचित्य साधून रेल्वेकडून येत्या काळात विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये पुण्यातून धावणाऱ्या 7 गाड्यांचा समावेश आहे. मात्र, यातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडे “कन्फर्म’ तिकीट असणे आवश्‍यक आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदादेखील रेल्वे प्रशासनाकडून सणांचे औचित्य साधून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. याशिवाय प्रवाशांनी मार्गदर्शन तत्वांसह मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.

या मार्गांवर धावणार विशेष गाड्या

 • पुणे-झांसी-पुणे साप्ताहित विशेष
  ही गाडी 21 ऑक्‍टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत दर बुधवरी झांसीहून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचेल. 22 ऑक्‍टोबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी पुण्याहून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी झांसी येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण 12 फेऱ्या होणार आहेत.
 • पुणे-जयपूर-पुणे द्विसाप्ताहिक विशेष
  ही गाडी 20 ऑक्‍टोबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत दर मंगळवारी आणि शनिवारी जयपूरहून रवाना होणार असून, दुसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचणार आहे. तर पुण्याहून 21 ऑक्‍टोबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत दर बुधवारी आणि रविवारी सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी जयपूर येथे पोहोचणार आहे.
 • पुणे-गोरखपूर-पुणे साप्ताहिक विशेष
  22 ऑक्‍टोबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत गोरखपूरहून गाडी दर गुरुवारी रवाना होणार असून, तिसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचणार आहे. तर 24 ऑक्‍टोबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत दर शनिवारी ही गाडी पुण्याहून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी गोरखपूर येथे पोहोचणार आहे.
 • पुणे-दरभंगा-पुणे साप्ताहिक विशेष गाडी
  ही गाडी 21 ऑक्‍टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत दर बुधवारी पुण्याहून रवाना होऊन, तिसऱ्या दिवशी दरभंगा येथे पोहोचणार आहे. तर 23 ऑक्‍टोबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी दरभंगाहून सुटणार असून, तिसऱ्या दिवशी पुण्यात दाखल होणार आहे.
 • पुणे-गोरखपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडी
  ही गाडी 22 ऑक्‍टोबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी पुण्याहून सुटणार असून, तिसऱ्या दिवशी गोरखपूर येथे पोहोचणार आहे. तर 24 ऑक्‍टोबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत दर शनिवारी गोरखपूरहून रवाना होऊन तिसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचणार आहे.
 • पुणे-मंडूआडीह-पुणे साप्ताहिक विशेष गाडी
  19 ऑक्‍टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दर सोमवारी ही गाडी पुण्याहून रवाना होणार असून, दुसऱ्या दिवशी मंडूआडीह येथे पोहोचणार आहे. तर, 21 ऑक्‍टोबर ते 2 डिसेंबर या कालावधीत दर बुधवारी गाडी मंडूआडीह येथून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचेल.
 • पुणे-लखनऊ-पुणे साप्ताहिक विशेष गाडी
  ही गाडी 20 ऑक्‍टोबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत दर मंगळवारी पुण्याहून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी लखनऊ येथे पोहोचेल. तर, 22 ऑक्‍टोबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी लखनऊहून रवाना होऊन, दुसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.