पुणेः फ्रेब्रुवारी महिन्यात राजधानी दिल्लीत तब्बल सात दशकांनी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. इतक्या वर्षांनी हे साहित्य समंलेन दिल्लीत होत असल्याने यास विशेष महत्व आहे. यामुळेच साहित्य रसिकांसाठी दिल्लीवारी करण्यासाठी भारतीय रेल्वे पुणे विभागाने दिल्लीसाठी विशेष रेल्वे गाडीचे आयोजन केले आहे. दीड हजार रुपये भरून साहित्य रसिकांना या विशेष रेल्वे गाडीने दिल्लीला जाता येणार आहे. या तिकीट दरामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही.
नुकतीच पुण्यातून प्रयागराजसाठी महाकुंभ मेळाच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली होती. जवळपास जानेवारी महिन्याच्या १५ तारेखेला सुरू झालेला महाकुंभ मेळा महिन्याभर चालणार असल्याने मोठ्या प्रमाणावर भक्त रेल्वेने प्रयागराजमध्ये जात आहे. दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे गाडी सोडावी, अशी मागणी सरहत संस्थेने केली होती. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री आणि संमेलनाचे सरकार्यवाह मुरलीधर मोहाळ यांच्या प्रयत्नामुळे रेल्वे मंत्रालयाने महाकुंभ आणि इतर अडचणी असतानाही ही रेल्वे सेवा मंजूर केली आहे.
रक्कम मात्र तीनपट
रेल्वे मंत्रालयाने सवलत न देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला असल्याने दिल्लीला येणाऱ्या साहित्य रसिकांची अडचण होऊ नये यासाठी दीड हजार भरून प्रवासी नोंदणी करू शकणार आहेत. ही विशेष रेल्वे गाडी स्लीपर क्लास असणार आहे. १९ फ्रेब्रुवारी या दिवशी पुण्यातून दिल्लीच्या दिशेने ही रेल्वे प्रस्थान ठेवणार आहे. २० फ्रेब्रुवारीला ही रेल्वे दिल्लीत पोहचेल. २३ फेब्रुवारीच्या रात्री परतीचा प्रवास सुरू होऊन २४ फेब्रुवारीला पुण्यात पोहचेल. ही विशेष रेल्वे असल्याने त्यासाठी भरावी लागणारी रक्कम सामान्य तिकिटीच्या तीनपट आहे.