पुणे – कुंभमेळ्यासाठी रेल्वेच्या ‘आयआरसीटीसी’मार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून सोडण्यात येणार आहे. दि. १५ जानेवारीच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही गाडी पुण्यातून कुंभमेळ्यासाठी सुटेल, अशी माहिती ‘आयआरसीटीसी’चे टुरिझम व्यवस्थापक सुभाष नायर यांनी दिली.
केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेअंतर्गत भारतगौरव ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे देशभरातून आतापर्यंत ८६ रेल्वे गाड्या धावल्या आहेत. याची माहिती देण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे विभागाचे झोनल मॅनेजर गुरूराज सोन्ना उपस्थित होते.
यावेळी नायर म्हणाले, पुण्यातून कुंभमेळ्यासाठी आम्ही विशेष गाडीचे नियोजन केले आहे. या गाडीमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. गाडीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही, जेवणाची व्यवस्था असणार आहे. तसेच, कुंभमेळ्याच्या ठिकाणी राहण्यासाठी टेंटसिटीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
ही गाडी पुणे, वाराणसी, प्रयागराज, आयोध्या, पुणे अशी धावणार आहे. सात रात्र, आठ दिवसांचा हा प्रवास असणार असून, या गाडीला सात स्लीपर, तीन थर्ड एसी, एक सेकंड एसी आणि एक पॅन्ट्री कार अशी डब्यांची रचना असणार आहे.