– डॉ. अशोक लिंबेकर
संत साहित्यात विठ्ठलभक्ती आणि पंढरीचे वर्णन करताना बराचसा भाग चंद्रभागेने व्यापलेला आहे. ‘माझे माहेर पंढरी आहे, आहे भिवरेच्या तीरी’ असे म्हणत संतानी ही खूण अधिक स्पष्ट केली आहे.
वारकरी पंथात एकादशी व्रत, वारी, हरिपाठ, नामस्मरण, भजन, कीर्तन इत्यादींना जसे महत्त्व आहे तसेच चंद्रभागेला आणि चंद्रभागेतील पवित्र स्नानालाही तितकेच महत्त्व आहे. पंढरीला जाऊन, चंद्रभागा पाहून, तिचे दर्शन घेऊनच सर्व वारकरी माघारी परततात. किबहुना आधी चंद्रभागेचे स्नान आणि नंतर विठुरायाचे दर्शन असा हा क्रम असतो. संत नामदेवांनी म्हटले आहे ‘आषाढी कार्तिकी भक्तगण येती हो साधुजन येती! चंद्रभागेमध्ये स्नानजे करती’ म्हणजेच चंद्रभागेच्या स्नानात मुक्तीचा आनंद आहे. त्यामुळेच चंद्रभागेच्या पवित्र स्नानाला वारकरी पंथामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे हे लक्षात येते.
‘सकल तीर्थाचे माहेर’ म्हणून चंद्रभागेचा अनेक संतांनी उल्लेख केला. ते संतांच्या अगाध विठ्ठलभक्तीचेच प्रतीक आहे. मराठी सामान्य जनांच्या मनात इतर तीर्थक्षेत्री जाता येत नाही याबद्दल कोणतीही खंत अथवा न्यूनगंड राहू नये म्हणूनच चंद्रभागेस मराठी संतांनी भूलोकीचे वैकुंठ हा दर्जा दिला. मराठी संताच्या अभंगातून चंद्रभागा तुडुंब भरून वाहते. चंद्रभागेच्या तीरावरच भावभक्तीचा व विठ्ठलभक्तीचा मळा फुलला. ‘माझी बहीण चंद्रभागा करितसे पाप भंगा’ असे म्हणून संत एकनाथांनी तिला सजीव मानवी देहरुपात पाहिले. तिला बहिणीचा दर्जा देऊन समग्र संत मेळ्यामध्ये चंद्रभागेलाही सामील करून घेतले. कधी माझी माय तर कधी बहीण अशा स्त्री रुपात तिला पाहिले गेले.
माझी माय चंद्रभागा! आज चांदण्यात न्हाली! असे म्हणूत संत जनाबाईने तर तिला चांदण्यात न्हाऊ घातले. हा अभंग म्हणजे उत्तम भावकाव्याचा नमुनाच. त्या दृष्टीने चंद्रभागा केवळ मोक्षदायिनी राहिली नाही तर ती इथे भावदायिनी बनली. चंद्रभागेच्या साक्षीनेच मराठी संत आपले जीवन जगले. आपले सुखदु:ख चंद्रभागेच्या पाण्यातच त्यांनी वाहिले आणि आपल्या व्यथा वंचनाही तिच्यातच विसर्जित केल्या.
संत नामदेवाचे वास्तव्यच चंद्रभागेच्या तीरावर असल्याने त्यांच्या अनेक अभंगातून या तीर्थाबद्दलचा आभिमान ओतप्रोत भरलेला दिसतो.
संत नामदेवाच्या अंतरंगातील उत्कट विठ्ठलभक्ती आणि पंढरी प्रेमाच्या असीम भावनेमुळे ते स्वाभाविकच ठरते. पंढरीचा प्रेमा म्हणूनच नामदेवांची ओळख असल्याने त्यांनी आपल्या पंढरी माहात्म्याच्या अभंगामध्ये चंद्रभागेची थोरवी गायली आहे. संत नामदेव म्हणतात, ‘सर्व सुख राशी भिवरेच्या तीरी । आमुची पंढरी कामधेनु ।’ या पुढे जाऊन ते ‘सकळा शिरोमणी चंद्रभागा’ असा उल्लेख करून सर्व तीर्थाहून अधिक महत्त्व चंद्रभागेस देतात. एवढेच नाही तर ‘प्रतिदिनी माध्यान्ही । सकळ तीर्थे तिये स्थानी । भिवरे सुस्नात होऊनी । विठ्ठल चरणी लागती ।’ असे म्हणून ते चंद्रभागेचे महात्म्य अभिव्यक्त करतात, हे लक्षात येते.
‘त्रिभुवनाची तीर्थे झाली ती मलीन । व्हावया पावन आली इथे ।’ फक्त भूतलावरच नव्हे तर तिन्ही लोकांमध्ये चंद्रभागा किती श्रेष्ठ आहे असा दाखला नामदेव या अभंगातून देतात. संत नामदेवांनी जे महत्त्व चंद्रभागेला दिले त्यामध्ये त्यांचे द्रष्टेपण आणि श्रेष्ठ प्रवक्त्याची अनन्यसाधारण अशी गुणसंपन्नता दिसून येते. वारकरी पंथाचा आणि विठ्ठलभक्तीचा प्रसार, प्रचार करण्यासाठी संत नामदेवांनी किती प्रयत्न केले याचे हे मूर्तिमंत प्रतीक आहे. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान! आणिक दर्शन, विठोबाचे! हेच तमाम वारकर्यांच्या जीवनाचे श्रेय असल्याने मराठी संताची चंद्रभागा ही मराठी लोकमानसामध्ये भक्तिभावाने प्रवाहित झालेली दिसून येते.
सामान्य मराठी जनाला इतरत्र कुठेही तीर्थाटन करता आले नाही, तरी त्यांच्या मनात कसलेही मानसिक, पारमार्थिक न्यूनगंड निर्माण होऊ नये याची पुरेपूर काळजी मराठी संतानी घेतली आणि त्यासाठी चंद्रभागेची थोरवी त्यांनी मुक्त कंठाने गायली. असे आपण सार्थपणे म्हणू शकतो. या चंद्रभागेच्या तीरीच गोमटी पंढरी वसलेली आहे याचा सार्थ अभिमान नामदेवांना होता. ऐसे तीर्थ कोणी दाखवा गोमटे! जेथे प्रत्यक्ष भेटे परब्रह्म! कोठे ऐसे क्षेत्र आहे त्रिभुवनी! सकळा शिरोमणी चंद्रभागा! या तीर्थासारखे अन्य तीर्थ नाहीच असे नामदेवांनी ठामपणे प्रतिपादन केले. सर्वांग व्यापिनी भीमा सुंदरी म्हणत त्यांनी चंद्रभागेच्या विशालतेचा, सौंदर्याचा वेध घेतला.
चंद्रभागेसी करिता स्नान! तुझे दोष पळती रानोरान! असे म्हणत या नदीच्या पावित्र्याची महिमा त्यांनी गायली.वारकरी पंथात चंद्रभागेच्या स्नानास एवढे महत्त्व का? याचे उत्तर आपणास संत नामदेवादी संताच्या अभंगातूनच मिळते. संत नामदेव चंद्रभागेस आद्यत्वाचा मान देतात. जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा । असे धाडसी विधान नामदेव करतात तेव्हा हे विधान भौगोलिक कसोटीवर तपासता येत नाही, सिद्ध करता येत नाही. नामदेवांच्या अगाध अशा पंढरी प्रेमातूनच हे आविष्कृत झाले.
चंद्रभागेच्या तीरावर कोणताही विधी केला जात नाही. मुळातच कर्मकांडाला फाटा देऊनच वारकरी पंथाने सुलभ भक्तीची शिकवण दिली. नाममाहात्म्य लोकमानसात रुजविले. त्यामुळे हा प्रयोग घडला आणि नंतर सर्वदूर पोहचला तोहि चंद्रभागेच्या साक्षीनेच. चंद्रभागेच्या तीरावर इतर तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी जे कर्मकांड केले जाते ते केले जात नाही. याचे कारण म्हणजे चंद्रभागेत नामभक्तीचे, कीर्तनरुपी श्रवणभक्तीचा पाया घातला गेला. जिथे देहभान विसरते अशा पवित्र स्थळी कोणती पापे शिल्लक रहाणार? या जाणीवेतूनच इथे घडतो तो केवळ नामघोष. महत्त्व आहे ते नामभक्तीला. तेराव्या शतकातील धार्मिक कर्मकांड आणि त्यातून होणारे सामान्य जनांचे शोषण याला पर्याय म्हणूनच वारकरी पंथाच्या रूपाने सुलभ अशा नामभक्तीचा पाया रचला गेला. त्याला अधिक प्रशस्त करण्याचे कार्य संत नामदेवांनी चंद्रभागेच्या तीरावरूनच केले.