बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने लॉकडाउनच्या काळात प्रवासी मजूर आणि गरिबांना मोलाची मदत केली होती. या कठीण परिस्थितीत त्याने अनेकांना मदतीचा हात दिला. सोनू सूदची ही मदत आताही सुरू आहे. सोनू सूदच्या या कार्याची दखल देशासह विदेशातही घेतली जात आहे.
एअरलाइन्स स्पाइस जेटकडून सोनू सूदचा खास पद्धतीने गौरव करण्यात आला आहे. त्याने केलेल्या कार्याची दखल घेत कंपनीच्या स्पाइजेट बोइंग 737वर त्याचा एक फोटो लावून त्याला शुभेच्छा देण्यात आली आहे. त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक खास ओळही लिहिण्यात आली आहे. त्यावर असे लिहिण्यात आले आहे की, “ए सॅल्यूट टू द सेविअर सोनू सूद.’ स्पाइस जेटने केलेल्या या विशेष गौरवाबद्दल त्याने आभार व्यक्त केले आहे.
याबाबत एका मुलाखतीत तो म्हणाला की, ही माझ्यासाठी सम्मानाची बाब आहे. मला आठवते की मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलो होतो तेव्हा अनारक्षित तिकटाने प्रवास केला होता. आता स्पाइस जेटने माझा गौरव केल्याने मी खूप भावुक झालो आहे. तसेच मला अभिमानास्पदही वाटत आहे. हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नसल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, सोनू सूदने महामारीच्या काळात लाखो गरिबांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्यासाठी मदत केली होती. तसेच विदेशात अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पुढाकार घेतला होता.