हल्ली राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. सध्या राजकारणात नवनवीन प्रघात पडताना दिसत आहेत. कधी कोणीही कोणाशी पण युती करतोय, आघाडी करतोय बरं मित्रपक्ष म्हणून सोबत राहतात आणि काही दिवसानंतर त्यांनाही बाजूला करतात अशी आत्ताची परिस्थिती आहे.आघाडीत राहून एकमेकांविषयी उघडपणे बोलता येत नाही,टीका करता येत नाही.
मग त्यावर या राजकारण्यांनी एक जबरा उपाय शोधला. तो म्हणजे पुस्तक लिहायचं आणि आपल्याच मित्र पक्षांवर जोरदार टीका करायची,राजकीय वादाची खमंग फोडणी द्यायची त्यामुळे पुस्तकाचा खप पण होतो, वाद रंगतो, चर्चा होते आणि आपणही चर्चेत राहतो. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
यामध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया आघाडीच्या पराभवाला आणि सलग तिसऱ्यांदा केंद्रात भाजप सत्तेत आल्याबद्दल काँग्रेसला दोष दिला आहे. ममता यांनी लिहिलेल्या तीन नव्या पुस्तकांचं कोलकत्ता अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्याच्या पहिल्या दिवशी प्रकाशन करण्यात आलं. ‘बांगला निर्वाचू अमरा’ म्हणजे ‘बंगाल निवडणुका आणि आम्ही’ या त्यांच्या एका पुस्तकात त्यांनी लोकसभा निवडणुकांच्या निकालांचं विश्लेषण केले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा या माध्यमातून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर ममता बॅनर्जी काँग्रेसवर सातत्याने टीका करताना दिसतात त्यांनी लिहिलेल्या निरीक्षणा नुसार काँग्रेसच्या अपयशामुळे इंडीया गटाला निवडणुकीत यश मिळू शकलेले नाही.
आम्हाला सर्व भाजप विरोधी शक्ती एकत्र करून राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत विरोधी गट हवा होता. सुरुवातीपासूनच आम्ही समान किमान कार्यक्रम आणि समान घोषणा पत्राचा आग्रह धरला. काँग्रेसला राष्ट्रीय गटाच्या नेत्याची खुर्ची ऑफर करण्यात आली होती पण असं असूनही एकसमान किमान कार्यक्रम किंवा कोणताही समान जाहीरनामा नव्हता. गटातील घटक पक्ष हे आपापसात लढले आणि त्याचा फायदा भाजपला झाला अशी तिखट टीका ममता बॅनर्जी यांनी या पुस्तकातून केली.
140 वर्षांच्या या पक्षाची सध्याची अवस्था कमालीची बिकट झाली आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे कोणीही येतो आणि टपली मारून जातो अशी त्यांची अवस्था झाली आहे. मित्रपक्षांनी साथ द्यायचं तर सोडा पण त्यांच्या बाजूने सुद्धा कोणी बोलत नाहीये. सगळं खापर काँग्रेसच्या माथ्यावर फोडण्यात येत आहे. एकेकाळी काँग्रेसचा राजेशाही थाट होता. एक प्रकारचा माज अहंकार होता पण तो आता सगळा उतरायला लागलाय.
गेल्या काही वर्षांपासून राजकारणात पुस्तक हे मात्र एक अस्त्र झाले आहे. आपल्याच मित्र पक्षां विरोधात याचा वापर केला जात आहे. मध्यंतरी शरद पवार यांचे लोक माझे सांगाती हे पुस्तक आलं होतं. या पुस्तकाची बरीच चर्चा झाली. या पुस्तकातून त्यांनी उघडपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या विषयी अनेक खुलासे केले. या पुस्तकातून शरद पवारांचा संपूर्ण निशाणा हा उद्धव ठाकरेंवरच होता म्हणजे त्यांच्याविषयी लिहिण्यासाठीच हे पुस्तक लिहिलं होतं का? असे वाटायला लागले आहे.
खरं म्हणजे 2019 मध्ये शरद पवारांनीच बरोबर खेळी करून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर बसवलं आणि नंतर ते मुख्यमंत्री म्हणून कसे योग्य नव्हते त्यांचे निर्णय कसे चुकायचे आम्हाला ते पटायचे नाही याचं वर्णन करत पुस्तकातून त्यांचे अक्षरशः वाभाडे काढले. थोडक्यात टीका करण्यासाठी पुस्तकाचा अस्त्र म्हणून हल्ली हे राजकारणी सर्रास वापर करताना दिसत आहेत.
आता इंडिया आघाडीचा फुगा तर फुटलेला आहे. म्हणजे ममता दीदी,समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आता आपले खोटे मुखवटे उतरून खरे चेहरे दाखवले. त्यामुळे काँग्रेस पक्ष कमालीचा एकटा पडला असून आता बेचैन झालाय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला. पक्षाचे अनेक दिग्गज पराभूत झाले. अनेक ठिकाणचे बालेकिल्ले बरखास्त झाले.
कठीण समयी कोणी मित्र कामाला येत नाही आणि तोच अनुभव आता काँग्रेसला येतोय. इतके वर्ष सत्तेची फळ चाखली खोट्या-नाट्या गोष्टी पसरवून चुकीच्या पद्धतीने राज्य केलं. फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करून सत्तेच्या जोरावर एका उन्मत्त हत्तीप्रमाणे ते वागले आणि आता तेच फिरून त्यांच्या जवळ आले. करावं तसं भराव म्हणतात ते अगदी खरंय आज काँग्रेसला कोणी विचारत नाहीये अशी त्यांची अवस्था आहे.
काँग्रेसच्या जीवावर सगळे पक्ष इंडिया आघाडीत एकत्र आले आणि आता सगळ्यांनी काँग्रेसचा काटा काढलाय. म्हणजे भाजपने काँग्रेस मुक्त भारताचा नारा दिला होता पण हे सगळे मित्र पक्ष बहुतेक काँग्रेस मुक्त भारत करतात की काय असं वाटायला लागले आहे. कारण हे सगळेच विरोधी पक्ष काँग्रेस मुक्त भारत करण्यासाठी एकवटले असल्याचे सध्याचे चित्र आहे. काँग्रेस पक्ष पूर्णपणे संपेल असं नाही पण मित्र पक्षांची वळवळ बघता काँग्रेस केवळ नावापुरता राहील हे मात्र नक्की…