प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
पुणे – शहरात रातराणी बसमार्फत रात्रीचे संचलन सुरू असते. मागील काही काळांत या बससेवेबाबत काही प्रवाशांच्या तक्रारी आलेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) रातराणी बस व डेपोमध्ये “वॉच’ ठेवण्यासाठी प्रथमच विशेष पथकाची नेमणूक केली आहे. यामुळे हे पथक रात्रभर धावणाऱ्या पीएमपीच्या रातराणी बसच्या संचलनात सुसूत्रता आणण्यासाठी गस्त घालणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सुमारे 1,700 हून अधिक बस आहेत. यामार्फत दिवसभर प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. दिवसाप्रमाणेच रात्रीदेखील प्रवाशांना बससेवा उपलब्ध व्हावी, याकरिता पीएमपीएमएल प्रशासनाने रातराणी बस सुरू केली. मात्र, यामधील काही बस रात्रीच्या सुमारास वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी पीएमपी प्रशासनाकडे केलेल्या होत्या.
यापूर्वी, रात्रीच्या वेळेस शहरातील डेपो व बसच्या तपासणी करण्याबाबत कोणतीही यंत्रणा नव्हती. मात्र, आता पीएमपीएमएल प्रशासनाकडून रातराणी बसच्या तपासणीसाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. यामुळे रात्रीच्या संचलनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विशेष पथकाच्या माध्यमातून सर्वत्र नजर असणार आहे.
रात्रीच्या बस संचलनादरम्यान बस व डेपो तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. यामुळे अनेकदा चालक व वाहकांकडून हलगर्जीपणा होत असल्याच्या प्रवाशांकडून तक्रारी आलेल्या होत्या. यामुळे रातराणी बस व डेपोवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केल्याची, बीआरटी विभागप्रमुख अनंत वाघमारे यांनी सांगितले.
पथकात चार कर्मचारी
रात्रीच्या सुमारास संचलनावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकात चार कर्मचारी असणार आहेत. यामध्ये शहरातील बस व डेपोची आठ ते दहा दिवसांतून रात्रीच्या वेळेस अचानकपणे तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.