पोलीस आयुक्त : बालकांप्रती चांगला द दृष्टिकोन ठेवावा
पिंपरी – गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणाऱ्या बालकांना वेळीच सकारात्मक दिशा देणे आवश्यक आहे. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा शोधून त्याद्वारे त्या बालकांना दिशा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाऊल उचलले आहे. पोलिसांनी बालकांप्रती दृष्टीकोन चांगला ठेवावा, अशी सूचना पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सर्व पोलिसांना दिल्या.
“विशेष बाल पोलीस पथका’ची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवारी (दि. 13) ऑटो क्लस्टर येथे पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते झाले. यावेळी अपर आयुक्त रामनाथ पोकळे, विशेष बाल पथकातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथील बाल न्याय प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जैद सय्यद, बाल सुरक्षा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते विजय बावीस्कर, मोरवाडी प्रथमवर्ग न्यायालयातील ऍड. मोरे आदींनी उपस्थितांना कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, या पथकात काम करत असताना एखाद्या बालकास देखील गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करून त्याला सकारात्मक ऊर्जा देता आली तर ती आपल्या जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी असेल. नजरचुकीने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संपर्कात आलेली झोपडपट्टी परिसरातील व व्यसनाधीनतेकडे वळालेल्या बालकांना या पथकाने समुपदेशन करावे. सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांचे पुनर्वसन करावे. यसाठी रोजगार मेळाव्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करून अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे. पोलीस स्टेशन स्तरावर ‘विशेष बाल पोलीस पथक’ स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये एक पोलीस अधिकारी आणि किमान तीन पोलीस कर्मचारी असणार आहेत. या पथकांचे नियंत्रण प्रमुख म्हणून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील काम पाहत आहेत.
प्रास्ताविक सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले. तर सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी आभार मानले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, गंगाधर नाईकरे, पोलीस कर्मचारी कैलास बोबडे, संतोष बर्गे यांनी विशेष परिश्रम घेतले.