विश्रांतीगृहांच्या देखभालीसाठी विशेष पथक

एसटी महामंडळ प्रशासनाचा निर्णय

पुणे – एसटीच्या वाहक आणि चालकांसाठी उभारण्यात आलेल्या विश्रांतीगृहांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी महामंडळाच्या वतीने विशेष पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. या पथकाच्या पाहाणीत विश्रांतीगृहांची दुरवस्था दिसल्यास संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा महामंडळाच्या प्रशासनाने दिला आहे. त्याशिवाय त्यांची दररोज स्वच्छता करण्यात यावी, असा आदेश विभागीय कार्यालयाने काढला आहे. त्याबाबतचा पाहणी अहवाल विभागीय कार्यालयाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथे चालक आणि वाहकांसाठी विश्रांतीगृहे बांधण्यात आली आहेत. या विश्रांतीगृहामध्ये दररोज किमान आठशे ते नऊशे कर्मचारी रात्री मुक्‍कामी असतात. त्याशिवाय बसच्या खेपांमध्ये अंतर असल्यास दिवसाही काही कर्मचारी येथे आराम करत असतात. मात्र, दररोज एवढ्या मोठ्या कर्मचाऱ्यांचा राबता असतानाही या विश्रांतीगृहांध्ये स्वच्छता ठेवण्यात येत नाही. या विश्रांतीगृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी महामंडळाच्या वतीने खाजगी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या ठेकेदाराचे कर्मचारी आठ-आठ दिवस त्याची स्वच्छताच करत नाही. त्याचा त्रास मुक्‍कामी असलेल्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे पिण्यासाठी पाणी नसणे, शौचालयाला आणि बाथरुमला कड्या तसेच दरवाजे नसणे, झोपण्यासाठी घ्यावा लागणारा जमिनीचा आसरा आणि लॉकर असूनही त्याला लॉक नसणे अशा समस्यांना कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात दैनिक “प्रभात’ ने 17 जूनच्या अंकामध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेऊन एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी त्याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचे आदेश दिले.

या विश्रांतीगृहांची स्वच्छता ठेवण्यासाठी सर्व डेपो व्यवस्थापकांना अचानक भेटी देण्याचे आदेश दिले आहेत. यापुढील कालावधीत असे प्रकार आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणाचीही हयगय केली जाणार नाही.
– यामिनी जोशी, विभागीय नियंत्रण

Leave A Reply

Your email address will not be published.