बोगस शिक्षकांच्या चौकशीसाठी खास पथक

पुणे – खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांचे खोटे आणि बोगस नेमणुकीचे आदेश देऊन कोट्यवधी रुपयांचा घोटळा प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर आता बोगस शिक्षक निवड प्रकरणे आणि तक्रारीसंदर्भात चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने सहसंचालक अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली खास पथक नेमले आहे. त्यामुळे बोगस शिक्षक निवडीच्या तक्रारी आल्यास त्याची पडताळणी शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली असलेल्या या पथकाकडून केली जाणार आहे.

शिक्षक नेमणुकीचे खोटे आदेश काढून कोट्यवधी रुपयांचा पगार हडप करणाऱ्या शिक्षक एजंट आणि शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्हा पुणे पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपवला. त्यानंतर शिक्षण खाते खडबडून जागे झाले असून त्यांनी अशा प्रकारच्या चौकशीसाठी शिक्षण सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. दरम्यान या प्रकरणात शिक्षण खात्यातील उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांपर्यंत या घोटाळ्याची पाळेमुळे गेली असल्याची शक्‍यता आहे. तसेच हे सर्व वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांची चौकशी करणे आणि कारवाई करणे यासाठी उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यापेक्षा मोठा अधिकारी असावा या हेतूने यापुढील प्रकरणासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, शिवसेना गटनेते देविदास दरेकर आणि शरद बुट्टे पाटील यांनी कागदपत्रांसह सभेमध्ये हे प्रकरण उघडकीस आणल्यामुळे शिक्षण विभागाला जाग आली असून भविष्यात अनेक धक्‍कादायक खुलासे समोर येणार आहेत.

घोटाळ्याची व्याप्ती वाढणार
शिक्षणाधिकाऱ्यांनी आणि संस्थाचालक एजंटांनी संगनमताने शिक्षक मान्यता आणि तुकड्या मान्यतेचे खोटे आदेश काढले हे शिक्षक संबंधित शाळांमध्ये कार्यरत असून गेली काही वर्ष पगार घेत आहेत. या प्रकरणानंतर आता आणखीन भयानक प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी खास पथक नेमल्याने आता या घोटाळ्याची व्याप्ती आणखीन वाढणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here