गोव्यात सुभाषचंद्र बोस यांच्यावरील सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग

"द फरगॉटन हिरो'ला प्रेक्षकांची मोठी पसंती

पणजी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ दिग्दर्शक श्‍याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या “नेताजी सुभाषचंद्र बोस : द फरगॉटन हिरो’ या सिनेमाचे आज “इफ्फी’मध्ये विशेष स्क्रिनिंग करण्यात आले.

भारत सरकारने नेताजींच्या 125 व्या जयंती वर्षाच्या उत्सवाला प्रारंभ केला असतानाच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “द फरगॉटन हिरो’ या सिनेमाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. नेताजींचा देशासाठी असलेल्या समर्पण भावनेचा आणि निःस्वार्थ सेवेचा सन्मान करण्यासाठी, त्याचे स्मरण ठेवण्यासाठी सरकारने प्रत्येक वर्षी 23 जानेवारी रोजी नेताजींची जयंती ‘पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

“नेताजी हे नेहमीच सर्व राष्ट्रीय नेत्यांमध्ये सर्वाधिक प्रिय नेता आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील सर्वोच्च आदर्श राहिले आहेत. “द फरगॉटन हिरो’ या सिनेमाच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे दुर्दम्य व्यक्तिमत्त्व आणि देशाप्रति असलेली निःस्वार्थ सेवा यांचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी आहे. या महान स्वातंत्र्य सैनिकाच्या 125 व्या जयंतीनिमित्त, आपण नेताजींच्या देशाप्रति असलेल्या असामान्य योगदानाचे स्मरण करू या, असे महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद म्हणाले.

नेताजी सुभाषचंद्र बोस द फरगॉटन हिरो या सिनेमामध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन खेडेकर हे नेताजींच्या मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या सिनेमाने 2005 मध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळविला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.