#Video: शेवटच्या मिनिटातला थरार आणि फुटबॉल विश्‍वकरंडक… 

निशिकांत ठिकेकर
महिन्याभरापासून सुरू असलेल्या फुटबॉल विश्‍वकरंडकाची सांगता झाली. वीस वर्षांनंतर फ्रान्स ने लढाऊ क्रोएशियाला अंतिम सामन्यात हरवून फुटबॉल विश्‍वकरंडक जिंकला. हा विश्‍वकरंडक बऱ्याच अर्थाने नावीन्यपूर्ण आणि इतर विश्‍वकरंडकांपेक्षा वेगळा होता. स्पर्धा सुरू होण्याच्या आधी रशियातील सुरक्षेबाबत आणि स्पर्धा आयोजनातील भ्रष्टाचाराबाबत प्रचंड प्रश्‍न उठविले जात होते पण जशी एकदा ही स्पर्धा चालू झाली तशा इतर गोष्टी बाजूला पडल्या आणि सर्व लक्ष पुढील चार वर्षे विश्‍वविजेता कोण होणार याकडे लागू राहिले.
VAR चा वापर 
फिफा  तर्फे प्रथमच VAR (video assisstance referee) या तंत्राचा वापर झाला. फ्रान्सला ऑस्ट्रेलियाविरुद्ध या तंत्राचा उपयोग पहिल्यांदा करून पेनल्टी देण्यात आली. VAR ने काही पेनल्टी रद्द झाल्या तर काही दिल्या गेल्या. VAR चा सर्वात वादग्रस्त निकाल हा अंतिम सामन्यात दिला गेला जेव्हा ग्रीसमनने कॉर्नरवरून मारलेला बॉल पेरिसाचाच्या हाताला लागला, हेतुपुरस्पर चेंडूला हात लावला असे पंचाने VAR द्वारे ठरवले आणि फ्रान्सला वादग्रस्त पेनल्टी बहाल केली.
मोठ्या संघांची निराशाजनक कामगिरी 
माजी विश्‍वविजेते आणि विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या जर्मनीवर गतसाखळीतच गारद होण्याची नामुष्की आली. अर्जेंटिना प्रचंड निराशाजनक कामगिरी करत कसेबसे बाद फेरीपर्यंत पोहोचला; पण नंतर मात्र फ्रान्ससमोर त्यांचा निभाव लागला नाही. स्पेनचा संघ चांगली कामगिरी करत असतानाच रशियाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये हरला. युरोपातील क्‍लबकडून खेळताना खोऱ्याने गोल करणारे हे खेळाडू देशाकडून खेळताना मात्र साफ अपयशी ठरले. केवळ काही चांगल्या खेळाडूंमुळे मोठी स्पर्धा जिंकता येत नाही तर त्यासाठी पूर्ण संघाने चांगलं कामगिरी करावी लागते हे मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार यांच्या देशांच्या अपयशामुळे आणखी एकदा सिद्ध झालं. संघ अपयशी असताना आईसलॅंड, क्रोएशिया, स्वित्झर्लंड, जपान यांसारख्या कमी लोकसंख्येच्या देशांनी या विश्‍वचषकात चांगली कामगिरी केली. मेस्सीच्या अर्जेन्टिनाला रोखत आईसलॅंडने कमाल केली तर क्रोएशिया पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहोचली. जपानने चांगला खेळ करत बाद सामान्यांपर्यंत मजल मारली, बेल्जियम विरुद्ध ते 2-0 असे आघाडीवर असताना सामना हरले.
प्रभावी कामगिरी 
या स्पर्धेत सर्वाधिक प्रभावित केलं ते क्रोएशिया, इंग्लंड आणि रशिया यांनी. रशिया अनपेक्षितरीत्या स्पेनला हरवून शेवटच्या 8 संघांमध्ये स्थान मिळवलं. ही त्यांची विश्‍वचषकातली सर्वात चांगली कामगिरी आहे. क्रोएशिया पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली. स्पर्धेत तीन वेळा त्यांनी पिछाडीवरून सामना जिंकला. कधीही हार ना मानण्याची प्रवृत्ती आणि त्याला कष्टाची जोड यांच्या बळावर ते इथपर्यंत पोहोचले. मेस्सीला रोखण्यासाठी त्यांनी अर्जेंटिनाविरुद्ध केलेले डावपेच हे वाखाणण्याजोगे होते. त्यांना कर्णधार लुका मॉड्रिक हा स्पर्धेतील सर्वात चांगला खेळाडू “गोल्डन बॉल”चा मानकरी ठरला.
या स्पर्धेत एमबापे या ताऱ्याचा उदय झालाय. अवघ्या 19 वर्षाच्या या खेळाडूची तुलना सध्या पेलेशी होतेय, पी.एस.जी या क्‍लबकडून खेळणाऱ्या युवा खेळाडूने एकूण चार गोल मारले, त्यात अंतिम सामन्यातील एक आणि अर्जेंटिनाविरुद्धचे 2 यांचा समावेश आहे. अतिशय वेगवान असा हा खेळाडू मैदानावरील त्याच्या खेळाने सगळ्यांनाच अतिशय प्रभावित करतोय. स्पर्धेतील “युवा खेळाडू” म्हणून त्याची सार्थ निवड झाली. फ्रान्स चा कर्णधार ह्युगो ल्योरीस याने “गोल्डन ग्लोव्ह” मिळवण्याची सुवर्णसंधी वाया घालवली. अंतिम सामन्यात त्याच्या चुकीमुळे क्रोएशियाने दुसरा गोल मारला आणि “गोल्डन ग्लोव्ह’ हा बेल्जियमच्या थिबोट कोर्टोईस याला मिळाला.
24 वर्षाचा असलेला इंग्लंडचा नवखा कर्णधार हॅरी केन याने 6 गोल मारत स्पर्धेवर ठसा उमटवलाय. इंग्लंडकडून कोणालाही अपेक्षा नव्हती, अत्यंत युवा असलेल्या या संघाने इंग्लंडच्या लोकांची राष्ट्रभावना जागवली, पूर्ण राष्ट्राला एक केलं. #itscominghome चे नारा सर्व देशभर गाजत होता. हॅरी केन या युवा कर्णधाराची कामगिरीने इंग्लंडने 26 वर्षांनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याने केलेल्या सर्वाधिक गोलमुळे त्याला “गोल्डन बूट” हा पुरस्कार मिळाला.
64 सामने, 12 स्वयंगोल, एकच गोल-शून्य बरोबरी, 169 गोल, युवा खेळाडूंचा उदय, शेवटच्या मिनिटातले गोल, बेल्जियमचा दोन गोलच्या पिछाडीनंतर विजय, रोनाल्डो-मेस्सी यांचे विश्‍वकरंडक जिंकण्यातलं अपयश, क्रोएशियाची स्वप्नवत वाटचाल, इंग्लंडचं #itscominghome, पेनल्टी शूटआऊट, रोमांचक सामने, शेवटच्या मिनिटातला थरार आणि आणखी बराच काही गोष्टी या विश्‍वचषकानंतर लक्षात राहील.
व्हिडीओ: प्रशांत शिंदे
VO: अमोल कचरे 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)