विशेष: ध्येयवेडा माणूस निर्माण करणे ही वाचन संस्कृती

रामदास थिटे

15 ऑक्‍टोबर हा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस भारतभर “वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा होत आहे. वाचन या अक्षर ब्रह्माची उपासना करत संपूर्ण राष्ट्राचे जीवन समृद्ध करणारा हा आविष्कार आहे. जीवन आदर्श करणे, सुस्थिर करणे यासाठी नियमित वाचनाचा संकल्प करूया.

वाचन का करावे?

वाचन हा एक संस्कार आहे, महाराष्ट्र आणि राष्ट्र समृद्ध करण्याचा आविष्कार आहे. वाचनाने मनास प्रेरणा, चेतना, उत्साह आणि प्रसन्नता निर्माण होते. एखादे पुस्तक जीवनाचा आधार बनते तर कित्येकांची यशोगाथा एखाद्या पुस्तक वाचनाच्या प्रेरणेतून साकारते. पुस्तकांच्या माध्यमातून कुठेच कटुता निर्माण होत नाही. गीतेत म्हटले आहे की, “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषूकदाचनम’ ही अखंड भारताची संस्कृती एका शब्दांत गीतेत दिली आहे. प्रत्येक माणसाचे हृदय हे एक पुस्तक आहे. त्याचे वाचन आपण केले तर माणूस वाचल्याचा आनंद प्राप्त होतो.

आजची पिढी आणि वाचन

समाज आणि सजग पालकांसमोरील सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न अर्थात ही डिजिटल पिढी अत्यंत हुशार आणि संशोधकवृत्तीची आहे. मुलगा आपलं ऐकत नसेल तर त्याचा अर्थ फार बिघडले असा घेऊ नका. जेब्रॉनचं पुस्तक वाचा, तो म्हणतो, आपल्या मुलाला बुरसटलेले विचार देऊ नका. त्याला विचारांचे स्वातंत्र्य द्या, पंखामध्ये बळ द्या, त्याचे पंख कापू नका. नवीन पिढी मोबाइल, टीव्ही, इंटरनेट, चॅटींग आणि कॅफे या वातावरणात अडकल्याने संकुचित झाली आहे. त्यांना विवेकबुद्धीनं पाहायला शिकवा, न्यायाने हवं तेच घ्यायला शिकवा. मात्र, त्यासाठी त्यांच्यातील विवेक जागृत करणं हे जुन्या पिढीचं काम आहे. त्यांना त्यांच्या पायाभूत विकास सुविधा निर्माण करून देणं, मार्गदर्शन करणे हे आपले काम आहे. त्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे कारण प्रचंड अशी शक्‍ती या वाचनामध्ये आहे. त्या माध्यमातून आपण पुढे जाऊ या कारण जेथे साहित्य आहे तेथे परमार्थ आहे.

वाचनाचे प्रकार

आपण वाचन करतो मात्र मूलभूत वाचन प्रकार माहिती असणे गरजेचे आहे. चार-पाच प्रकारे वाचन करणे गरजेचे आहे. 1) रिडींग फॉर नॉलेजः याला आपण एज्युकेशन म्हणू या. स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाचे वाचन. 2) संवादासाठी प्रकट वाचन झाले पाहिजे. यामुळे आकलन शक्‍तीत वाढ होते. उपयोजन कौशल्य वाढते. 3) चिकित्साप्रधान वाचन. (क्रिटीकल रीडिंग) 4) आस्वादप्रधान वाचन. (रीडिंग फॉर ऍप्रीसिएशन) 5) कल्पनाप्रधान वाचन. (क्रिएटीव्ह रीडिंग) याला महत्त्व दिल्याने वेगवेगळ्या कल्पनांचा समूह तयार होऊन भावनाविश्‍वात वाढ होते. एक-एक कल्पना एकमेकांना दिली तर दोन कल्पना तयार होतील.

काय वाचावे?

अनेक पुस्तकातलं एक पुस्तक, एका पुस्तकातलं एक प्रकरण, एका प्रकरणातलं एक पान, त्या पानातला एक परिच्छेद, परिच्छेदातील एक ओळ आणि ओळीतला एक शब्द… हा एक शब्द आपल्या जीवनाला दिशा देतो इतकी शक्‍ती या वाचनात आहे. स्वराज्य, इन्कलाब झिंदाबाद, तुम मुझे खून दो, जयहिंद, मृत्युंजय, छावा, श्रीमानयोगी, पानिपत किती प्रेरणादायी शब्द ज्यांनी पुस्तकांद्वारे राष्ट्रांचा इतिहास मांडला. इंग्रजी शिकण्याला विरोध नाही मात्र, संत वाङ्‌मय आपण वाचणार की नाही? ज्ञानेश्‍वरांनी आपल्याला ज्ञान दिलं, नामदेवांनी भक्‍ती दिली, तुकोबांनी वैराग्य दिलं, संत रामदासांनी सामर्थ्य दिलं, गाडगेबाबांनी स्वच्छता दिली तर तुकडोजी महाराजांनी राष्ट्रभक्‍ती दिली, हे सर्व आपण वाचणार की नाही. ज्या घरात हा विचार नाही ते घर म्हणजे खिडक्‍यांशिवाय असलेलं घर.

ग्रंथ हा शब्द अडीच अक्षरांचा, पुस्तक हा शब्द साडेतीन अक्षरांचा, साऱ्या विश्‍वाचं ज्ञान, जिज्ञासा, माहिती, संस्कार आणि संस्कृती या पुस्तकामध्ये असते.

वाचन प्रेरणेचे उत्तरदायित्व

फक्‍त वाचून चालणार नाही तर त्यावर चिंतन आणि मनन झाले पाहिजे. पं. नेहरू म्हणत, प्रत्येक माणसाच्या डोळ्यांतील एखाद्या दिवशी एखादा अश्रू पुसण्याचा प्रयत्न करा. पुस्तकांच्या माध्यमातून या उत्तरदायित्वाची जाण होते. लोकमान्यांनी मंडालेच्या तुरुंगातील “गीतारहस्य’ आपल्याला दिलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे “माझी जन्मठेप’, गांधीजींचे “सत्याचे प्रयोग’, म. फुले यांचे “गुलामगिरी’, “शेतकऱ्यांचा आसूड’ आपल्या घरात असावेतच.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांतील वाचन प्रेरणा
ज्ञान, विज्ञान, साहित्य, संगीत, कला, संस्कृती, विज्ञान, मानसशास्त्र या जीवनशाखा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत.

छोट्याशा ग्रंथालयांची जबाबदारी समाज, सरकार, शाळा, महाविद्यालय यांनी स्वीकारली पाहिजे. 24 तासांतून 1 तास वेळ वाचनासाठी काढा. वेळ काढा आणि पुस्तके वाचा हा संदेश अनेक पिढ्यांपासून आला आहे. वाचक आणि ग्रंथालय यांचा संगम म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. आपले व्यक्‍तिगत संग्रहालय असावे. त्यात कथा, कविता, मासिके, नियतकालिके, वर्तमानपत्रं, कादंबऱ्या, इतिहास, प्रवासवर्णने यांचा समावेश असावा. तीर्थयात्रांपेक्षा ग्रंथयात्रा अधिक पुण्यप्रद असते कारण यामुळेच वाचन या अक्षर ब्रह्माची खरी उपासना घडते. वाचन चळवळीचा विकास हे आयुष्याचे ध्येय होय.

Leave A Reply

Your email address will not be published.