विशेष : आर. के. नारायण

शर्मिला जगताप

“मालगुडी डेज’ या भारतीयांच्या मनावर गारूड करणाऱ्या पुस्तकाचे लेखक आर. के. नारायण यांचा आज स्मृतिदिन. टीव्हीवर “मालगुडी डेज’ ही मालिका किशोरवयात पाहिली. त्यानंतर हे पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा झाली. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांकडे मी हे पुस्तक विकत आणण्यासाठी पैसे देत होते. काहीतरी कारणास्तव हे पुस्तक त्यांना आणता आले नाही. असे चार-सहा जणांकडे रोज पैसे द्यायचे. सहाव्या-सातव्या दिवशी सर्वजण हे पुस्तक विकत घेऊन आले. माझ्याकडे एकदम या एकाच पुस्तकाचे चार-सहा नग हाती पडले. यातील गमतीचा भाग सोडला तर हे पुस्तक वाचण्याची माझी तीव्र अभिलाषा यातून दिसून येते.

“मालगुडी’ नावाचे काल्पनिक गाव निर्माण करून गावातील निरनिराळ्या स्वभावाच्या व्यक्‍तिरेखा, मुलांचा खोडकरपणा, त्यांचे भावविश्‍व अत्यंत सुंदररीतीने त्यांनी मांडले आहे. त्यांचे लिखाण अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.

ते इंग्रजी वर्तमानपत्रातून तसेच नियतकालिकातून लेखन करीत. त्याचवेळी त्यांनी “स्वामी आणि मित्र’ ही पहिली कादंबरी लिहिली. ते हस्तलिखित ऑक्‍सफर्ड येथील मित्राकडे पाठविले. या मित्राने लेखक ग्रॅहम ग्रीन यांना हस्तलिखित दाखवले. ग्रीनने आपल्या प्रकाशकाला पुस्तकाची शिफारस केली आणि कादंबरी वर्ष 1935 साली प्रकाशित झाली. वर्ष 1937 मधील त्यांच्या महाविद्यालयीन अनुभवावर “द बॅचलर ऑफ आर्टस्‌’ ही त्यांची दुसरी कादंबरी होती. त्यानंतर वर्ष 1938 मध्ये जुलमी पुरुष आणि शोषित स्त्रीच्या आयुष्यावर आधारित “द डार्क रूम’ ही तिसरी कादंबरी त्यांनी लिहिली. त्यांच्या पहिल्या तीन पुस्तकांमध्ये नारायण यांनी सामाजिक परिस्थिती, विद्यार्थ्यांची होणारी परवड तसेच रूढी, परंपरा व त्याचा स्त्रियांना होणारा त्रास यावर प्रकाश टाकला होता. “द गाइड’, “द मॅन-इटर ऑफ मालगुडी’ या पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.

त्यांच्या आजी त्यांना खूप गोष्टी सांगायची, त्यातूनच लेखनाचे बीज रोवले गेले. त्यांना वाचनाची खूप गोडी लागली. त्यांच्या आजीने सांगितलेल्या गोष्टींवरून त्यांनी लिहिलेली “द ग्रॅंडमदर्स टेल’ ही त्यांची अखेरची कादंबरी ठरली. वर्ष 1965 साली “गाइड’ हा चित्रपट त्यांच्या वर्ष 1958 मध्ये लिहिलेल्या “द गाइड’ या इंग्रजी कादंबरीवर आधारित होता. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार तसेच शासनाने पद्‌मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.

नारायण हे विद्यार्थीदशेत प्रवेश परीक्षेसाठी इंग्रजीमध्ये नापास झाले विशेष म्हणजे कालांतराने ते इंग्रजी लेखक म्हणून प्रसिद्धीस आले. लेखन हेच आपले कार्यक्षेत्र चांगले होऊ शकेल, असे वाटल्याने त्यांनी लेखनावर लक्ष केंद्रित केले.

साहित्याच्या दुनियेत या लेखकाचे स्थान अद्वितीय आहे. पुढे नारायण यांची जवळपास सर्वच पुस्तके वाचली. त्यांच्या पुस्तकातील काल्पनिक पात्रं आणि आपल्या आजूबाजूचे सजीव पात्रं यांचा योगायोग जुळून येतो. त्यांच्या काल्पनिक घटना आजच्या परिस्थितीत हुबेहूब लागू पडतात. यात त्यांच्या दूरदृष्टीचा साक्षात्कार होतो. जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांच्या लेखनात आढळतो. अशा प्रतिभाशाली लेखकाचे 13 मे 2001 रोजी चेन्नई येथे 94व्या वर्षी निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.