विशेष : कृषी पर्यटनाला चालना

– प्राजक्ता पांगारकर
सध्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन भरभराटीला येत आहे. खासकरून शहरी लोक कृषी पर्यटनाकडे आकर्षित होत आहेत. यामुळे कृषी पर्यटन बहरत असून येत्या काळात हा मोठा उद्योग होऊ पाहात आहे. सरकारनेही कृषी पर्यटनाला चालना दिली आहे.
पूर्वीच्या मानाने आजकाल पर्यटन खूप प्रमाणात वाढले आहे. साधारण पर्यटन म्हटलं, की लोक देवदर्शन, एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाणं, वीकेंडला एखाद्या रिसॉर्टवर जाऊन विश्रांती घेणं किंवा एखादी परदेशवारी, ऐतिहासिक स्थळांना भेट देणं किंवा एखाद्या शहराला आणि तिथल्या प्रसिद्ध वास्तूंना भेट देणं, फेरफटका मारणं किंवा साहसी गोष्टी करणं, हे प्रामुख्याने डोळ्यासमोर येतं. परंतु यामध्ये अजून एक पर्यटन हे सध्या विकसित होत आहे आणि लोकांना, विशेषतः शहरी लोकांना आकर्षित करत आहे, ते म्हणजे कृषी पर्यटन.
शहरातलं वाढतं प्रदूषण, जिथे बघावं तिथे दिसणारं काँक्रीटचं जंगल, ट्रॅफिकचा कोलाहल, इच्छितस्थळी वेळेवर पोहोचण्यासाठी होणारी जीवाची घालमेल, घड्याळाच्या काट्याबरोबर धावणं, शहरातली वाढती गर्दी, ट्रॅफिकच्या या भल्या मोठ्या रांगा, ट्रेन किंवा बसमध्ये खचाखच भरलेली माणसं आणि एवढं करून ऑफिसला पोहोचल्यावर ऑफिसचा ताण तो वेगळाच. अशावेळी एखाद्याला गावाकडे जाऊन राहावं असं वाटलं, तर नवल ते काय! शहरातल्या माणसांना गावाचं आकर्षण हे असतंच. म्हणूनच दोन दिवसांसाठी का होईना, पण गावातलं वातावरण अनुभवायचं असेल, तर कृषी पर्यटनासारखा दुसरा पर्याय नाही.
शेणाने सारवलेलं ऐसपैस घर, जणू आपला स्वतंत्र असा छोटासा वाडा, शुद्ध हवा, घराबाहेर पडवीत एक विहीर, विहिरीवरून पाणी काढणं, चुलीवरचं जेवण, लांबवर जिथे नजर जाईल, तिथवर पसरलेलं शेत, आपल्याच शेतातल्या फळभाज्यांनीयुक्त असलेलं जेवण, घरात झोपाळा, अंगणात फुलांची सुंदर मोठी बाग, गोठ्यात गायी-म्हशी आणि नुकतंच गायीला झालेलं एक अल्लड वासरू, गायी म्हशीचं अस्सल शुद्ध दूध, रात्रीच्या वेळी अधूनमधून दिसणारे काजवे, सकाळचं अंगणात पडलेलं कोवळं ऊन, बैलगाडीतून केलेला प्रवास, शेकोटी पेटवून थंडीच्या दिवसांत शेतावर केलेली हुरडा पार्टी, आहाहा! हे चित्र नक्कीच आपल्या मनाला सुखावतं. हो की नाही.
परंतु कायमचं गावात येऊन राहणं, हे वाटतं तितकं सोपं नाही. विशेषतः शहरी माणसाला तर नाहीच नाही. सोयीसुविधांचा अभाव, वीज जाणं, पाणीटंचाई, शारीरिक अंग मेहनत हे सगळं शहरी माणसाच्या पचनी पडेल असं नाही आणि म्हणूनच कृषी पर्यटनाद्वारे दोन दिवस किंवा चार-पाच दिवस गावात येऊन तिथल्या जीवनाचा आनंद घेणं हे शहरातल्या लोकांसाठी पर्वणीच आहे. थोडक्यात, कृषी पर्यटन म्हणजे दोन- चार दिवस एखाद्या गावात येऊन शेतीचा आणि एकूणच ग्रामीण जीवनाचा अनुभव आणि आनंद घेणं.
आतापर्यंत शेतकरी, शेतीला पूरक असणारे व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन, शेळ्यामेंढ्या पालन, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, पशुपालन, रोपवाटिका, यासारखे व्यवसाय करत आला आहे. परंतु सध्या कृषी पर्यटन हा भरघोस उत्पन्न देणारा शेतीला पूरक असा व्यवसाय ठरत आहे. आजकाल बेभरवशी पाऊस, अस्मानी संकट किंवा दुष्काळ यामधून त्रस्त शेतकरी कृषी पर्यटनाकडे नक्कीच वळू शकतो. यासाठी सरकारसुद्धा शेतकर्याला मदत करू पाहतंय. कृषी पर्यटन, व्यवसाय म्हणून करायचा असेल, तर सरकारकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे अनिवार्य ठरतं. एकदा नोंदणी प्रमाणपत्र मिळालं की, त्या आधारे बँकेकडून कर्ज मिळणंही सोपं जातं.
तसंच कृषी पर्यटन करणार्याला, इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. शिवाय राज्य सरकार कृषी पर्यटन करणार्या शेतकर्यांसाठी मार्गदर्शन पर अभ्यास वर्गही चालवतं. त्याचाही लाभ शेतकरी घेऊ शकतात. परंतु कृषी पर्यटन केंद्र स्थापन करण्यासाठी काही अटींची पूर्तता करणं आवश्यक असतं. जसं की पर्यटकांना राहण्याची योग्य सोय, मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था, स्वच्छता इत्यादी काही बाबींची पूर्तता करावी लागते.
यानिमित्ताने पर्यटकांना शेती नेमकी कशी केली जाते, शेतात कसं काम केलं जातं, याची माहिती मिळण्यास मदत होते. त्याशिवाय ग्रामीण लोकजीवन जवळून बघता येतं. ग्रामीण लोककलेचा आनंद घेता येतो. पर्यटकांना शेतात स्वतः नांगरणी, पेरणी करण्याचा अनुभव मिळतो, पर्यटकांना ताज्या फळभाज्यांचा आस्वाद घेता येतो. शिवाय शेतकर्याला त्याच्या मालाला पर्यटकाच्या रूपात थेट बाजारपेठ उपलब्ध होते. पर्यटकांना इथे राहण्याची सर्व सोय उपलब्ध केलेली असते. स्वच्छ खोल्या, शेणाने सारवलेली जमीन, तसेच सेंद्रिय शेतीवर भर दिला गेला असल्यामुळे जनावरांच्या शेणाचा खत म्हणून वापर केला जातो. या शेणाद्वारे आणि पालापाचोळ्याद्वारे बायोगॅस निर्माण करून, तोच अन्न शिजवण्यासाठी वापरला जातो. अशा प्रकारे पर्यावरण पूरक गोष्टींना प्राधान्य दिलं जातं.
तसंच झाडांना दोर्या आणि दोर्यांना टायर्स बांधून नैसर्गिक झोपाळ्याची सोय केलेली असते. हौदामध्ये पाणी साठवून तिथे डुंबायची सोय केलेली असते. याव्यतिरिक्त कृषी पर्यटन केंद्रांनी, शाळांशी संलग्न राहिल्यास विद्यार्थ्यांच्या सहलींचंही आयोजन करता येऊ शकतं. याद्वारे शाळकरी विद्यार्थ्यांचा शेतीकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन तयार होण्यास मदत होते. ज्या गावांमध्ये कृषी पर्यटन व्यवसाय बहरत आहे, तिथल्या स्थानिक लोकांनाही लघुउद्योगाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
शेतकर्यांचं आत्महत्येचं वाढतं प्रमाण, शेतमालाला योग्य तो हमीभाव न मिळाल्यामुळे, शेतीमध्ये नुकसान होत असल्यामुळे व अशा अनेक कारणांमुळे, शेतकर्यांची मुलं ही शेती सोडून नोकरीच्या शोधात शहरात येतात, त्यामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान होत आहे. म्हणूनच शेती सारख्या पारंपरिक व्यवसायाला चालना मिळण्यासाठी त्याच्या जोडीला पूरक असा, कृषी पर्यटन व्यवसाय शेतकर्यांना नवी उभारी देण्यास नक्कीच मदत करेल. यातून आजचा तरुण शेतकरी, शेतीकडे नक्की वळेल, यात शंकाच नाही.
परदेशामध्ये कृषी पर्यटन हा उद्योग म्हणून फार आधीपासूनच विकसित झाला आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इटली, अमेरिका आणि अशा बर्याच देशांमध्ये शेतीला पूरक म्हणून कृषी पर्यटनाला प्राधान्य दिले गेले आहे. त्याच धर्तीवर भारतामध्ये कृषी पर्यटनाची सुरुवात ही पहिल्यांदा महाराष्ट्रापासूनच झाली. महाराष्ट्रात 2004 सालापासून हे क्षेत्र विकसित व्हायला सुरुवात झाली आणि आतापर्यंत जवळ जवळ 350 कृषी पर्यटन केंद्र स्थापन झाली आहेत. यानिमित्ताने गावातला शेतकरी गावात राहण्यास मदत होईल, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि कल्पकता यांची सांगड घालून शेतीला यापुढे नक्कीच चांगले दिवस येतील. खेड्यांचा विकास तर होईलच; परंतु कृषी पर्यटनाद्वारे एकूणच देशाचाही विकास होण्यास मदत होईल.





