जालन्यातील तरूणीवर अत्याचाराची एसआयटीमार्फत होणार चौकशी

राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल

मुंबई  (प्रतिनिधी) – जालना जिल्हयातील तरूणीवर मुंबईतील चुनाभट्टी येथे अत्याचार झाला होता. त्यानंतर तिचा उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मृत्यू झाला. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीच्या विशेष चौकशी पथक (एसआयटी) मार्फत होणार आहे.

या प्रकरणी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना नोटीस बजावली होती. त्यानुसार शनिवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित युवतीचे बंधू, त्यांचे अन्य नातेवाईक व सहकारी यांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले आणि न्याय मिळवून देण्याचा दिलासा दिला. त्या दृष्टीकोनातून रहाटकर यांनी चुनाभट्टी पोलिस स्थानकाच्या कार्यालयात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, अतिरिक्त पोलिस आयुक्त लख्मी गौतम, पोलिस उपायुक्त शशि मीना यांच्या उपस्थितीत बंधू, त्यांचे नातेवाईक आणि सहकार्यांशी तपशीलवार चर्चा केली.या चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.

मृत्यू पावलेल्या युवतीच्या भावाला पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे. या घटनेचा प्रारंभिक तपास करताना मुंबईच्या पोलिस निरीक्षक शिर्के यांनी भावाला नीट वागणूक दिली नसल्याच्या आरोपाचीही चौकशी होणार आहे. औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात तज्ज्ञ, निष्णात डाक्‍टरांच्या पथकामार्फत शवविच्छेदन करण्यात येईल. या शवविच्छेदनाला बंधू आणि त्यांच्या पालकांनी संमती दिलेली आहे. औरंगाबादमधील घाटी रूग्णालयातील डॉक्‍टरांनी पीडितेच्या कुटुंबीयांना नीट वागणूक दिली नाही या आरोपाचीही चौकशी करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.