नवी दिल्ली – करोना विषाणूच्या साथीच्या वातावरणात ज्येष्ठ नागरिकांना हा आजार होण्याचा अधिक धोका असतो, वयोमानानुसार त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. शिवाय अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्चरक्तदाब, किडनीशी संबंधित अनेक आजार, दमा किंवा श्वसनाशी संबंधित विकार असतात. त्यासोबतच, त्यांना करोनाचा संसर्ग झाल्यास, तो गंभीर आजार होऊ शकतो आणि अनेकदा त्यात जीव जाण्याचीही भीती असते. म्हणून देशभर लागू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिकांनी घरी येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांना भेटू नये. थोड्या थोड्या वेळाने आपले हात आणि चेहरा साबणाने स्वच्छ धुवावा. केवळ घरात शिजलेला ताजा आणि पोषक आहार घ्यावा. वारंवार पाणी प्यावे आणि फळांचा ताजा रस पिऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवावी. व्यायाम आणि प्राणायाम करावा. दररोज घ्यायला सांगीतलेली सर्व औषधे नियमित घ्यावीत.
आपल्या नातेवाईकांशी संवाद साधावा. दूर असलेल्या नातेवाईक, मित्र यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलत रहावे. डोळ्यांचे मोतिबिंदूचे ऑपरेशन, गुडघे प्रत्यारोपण आदी काही शास्त्रक्रिया ठरल्या असतील, तर अशा शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात.
वारंवार स्पर्श केली जाणारी सर्व ठिकाणे जंतुनाशके आणि पाण्याने स्वच्छ करा. जर आपल्याला ताप, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित जवळच्या डॉक्टरांना दाखवा आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व सूचना, सल्लयाचे काटेकोर पालन करावे, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.