थंडीसाठी खास पदार्थ- 2

दिवाळीच्या सुमारास किंवा आत्ता दिवाळीनंतर ज्वारीची कोवळी कणसं भाजून त्यात तीळ मिसळून खाण्याची पद्धत आजही लोकप्रिय आहे. बरोबर वांग्याचं भरीत आणि ताजं दही खाण्याची रीत आहे.

उडीद : महाराष्ट्राला उडीद नवीन नाहीत. रोजच्या रोज आपण उडीद खात असतो. इडली-डोसा, उत्तप्पासारख्या खाद्यपदार्थात उडदाच्या डाळीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कोकणी लोकांचं तर आंबोळ्या म्हणजे पंचपक्वान्न. मूग-उडदाचे लाडू करतात. उडदाचे पीठ, मेथी, साखर, सुकामेवा यांच्यापासून साजूक तुपात केलेल्या वड्या गुजराती समाजात “अददिनो पाक’ या नावाने प्रसिद्ध आहेत. ज्यांना उडीद पचत नाहीत त्यांनी मुगाच्या डाळीपासून पदार्थ बनवावेत.

दुधाचे पदार्थ: गाईच्या किंवा म्हशीच्याही दुधाचा वापर करण्यास हरकत नाही. दही, ताक, लोणी, तूप, खवा-मावा, खीर-पायस, बासुंदी, सायीच्या बर्फीचा आहारात उपयोग करावा. केसर टाकून दूध प्यावं.

उसाच्या रसाचे पदार्थ : हेही पदार्थ या थंडीच्या दिवसात आरोग्यादायी असतात. उसाच्या रसातून भरपूर उष्मांक मिळतात. तसंच साखर, गूळ, काकवी हे पदार्थही उसाच्या रसापासूनच तयार करतात. साखरेपेक्षा गुळाचा वापर करून केलेले पदार्थ या ऋतूत खाणं आरोग्यास केव्हास चांगलं. गूळ उष्णही आहे.

गूळपापडी, चिक्की, त्यातूनही सुकामेवा टाकून केलेली चिक्की, गुळाच्या पाकात केलेले लाडू खावेत. यावरून आपल्या हे लक्षात येईल की, प्रत्येक ऋतूत निसर्ग आपल्याला खाद्य पुरवतो, पण त्याचा वापर आपण आपल्या आहारात कसा केला पाहिजे, हे आपल्या हातात असतं. हा वापर करताना आरोग्य बिघडणार नाही, याचंही भान राखावं.

Leave A Reply

Your email address will not be published.