लसीच्या उपलब्धतेवर तज्ञांच्या समितीचा विशेष भर

नवी दिल्ली – कोविड-19 विरोधी लस उपलब्ध होण्यासाठी योग्य यंत्रणा अस्तित्वात असावी, यावर राष्ट्रीय पातळीवरील तज्ञांच्या गटाने विशेष भर दिला आहे. भारतीय अथवा आंतरराष्ट्रीय उत्पादकांकडून ही लस उपलब्ध करण्यात यावी. त्याबरोबर लोकसंख्येतील गटांसाठी या लसीकरणासाठीच्या प्राधान्यक्रमाची मार्गदर्शक तत्वेही उपलब्ध व्हावीत, असे या तज्ञांच्या समितीने म्हटले आहे. 

ही लस मिळवण्यासाठी कोणत्याही पर्यायी मार्गाचा अवलंब करू नये, अशी सूचनाही राज्य सरकारांना केली आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांच्या अध्यक्षतेखालील या तज्ञांच्या गटाची आज पहिली बैठक झाली. 

लसीकरणाच्या संकल्पना आणि अंमलबजावणीसाठी संशोधक व्यवस्थापनासाठी डिजीटल पायाभूत सुविधा, लस वितरीत करण्याची यंत्रणा आणि लसीकरण प्रक्रियेचा अखेरच्या व्यक्‍तीपर्यंतचा पाठपुरावा करण्यात यावा अशी अपेक्षाही या तज्ञांच्या समितीने व्यक्‍त केली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

ही लस उपलब्ध करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या आर्थिक स्रोतांबाबत आणि अर्थसहाय्यासाठीच्या विविध पर्यायांबरोबरच वितरणासाठीचे माध्यम, शीतगृह शृंखला आणि लसीकरणासाठेच्या अन्य पायाभूत सुविधांबाबतही चर्चा झाली. लस सुरक्षितता, देखरेख आणि सामुहिक लसीकरणाशी संबंधित लसींची वाहतुक, जनजागृतीबाबतही चर्चा झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.