– अरविंद बन्सी मोढवे
12 नोव्हेंबर रोजी पक्षीतज्ज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त ‘जागतिक पक्षी दिन’ साजरा केला जातो. सलीम अलींच्या कार्यामुळे भारतातील अनेक लोक पक्षी निरीक्षण आणि पर्यावरणाचं महत्त्व समजून घेऊ लागले. त्याचप्रमाणे, आज पर्यावरणातील असंतुलन, वातावरणीय बदलांमुळे पक्ष्यांच्या अस्तित्वावर मोठं संकट ओढावले आहे.
त्यामुळे पक्षी संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे. पक्षी हे परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत आणि जैवविविधता टिकवण्याचं कार्य निसर्गात करत असतात. त्यांना संवर्धित केलं तर मानवाचं आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल टिकवता येईल. निसर्गात पक्ष्यांचं असणं हे जणू सुंदरतेची आणि संतुलनाची एक अनोखी भेटच आहे.
पक्षी निसर्गाच्या सौंदर्यात भर घालतात. त्यांच्या किलबिलाटानं वातावरणात प्रसन्न होते, तर त्यांच्या रंगीबेरंगी पिसांनी वनश्रीला एक अद्वितीय शोभा मिळते. मात्र, या सौंदर्याच्या पलीकडेही पक्ष्यांचं निसर्गचक्रातील स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. फुलं, फळं आणि वनस्पतींच्या प्रजातींना निर्मितीसाठी परागसिंचन होणे आवश्यक आहे आणि हे महत्त्वाचे कार्य पक्षी करतात. फुलांवर बसणारे पक्षी परागकण एका फुलातून दुसर्या फुलात पोहोचवतात, ज्यामुळे वनस्पतींचं पुनरुत्पादन होतं.
पक्ष्यांची आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे बीजप्रसार. फळं खाताना पक्षी बियांसह उडून जातात आणि त्या बिया दूरच्या ठिकाणी पाडतात. त्यामुळे नव्या वनस्पती आणि झाडं उगवतात, ज्यामुळे निसर्गाची जैवविविधता टिकून राहते. अनेक पक्षी कीटक खाऊन आपलं पोट भरतात. त्यामुळे शेती आणि पर्यावरणातील कीटक नियंत्रण होतं. उदाहरणार्थ, कबूतर, गिधाडं आणि अनेक पक्षी बर्याच प्रमाणात कीटक खातात. त्यामुळे हानिकारक कीटकांचं प्रमाण कमी राहतं आणि त्यामुळे शेतातील पिकांचं संरक्षण होतं.
गिधाडांसारखे मांसाहारी पक्षी मृत प्राण्यांचे अवशेष नष्ट करतात, ज्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता कमी होते शिवाय मातीचं पोषण वाढते. पक्ष्यांच्या स्थलांतराच्या वेळा, त्यांच्या हालचाली आणि वर्तनबदल यावरून हवामानातील बदलांचं संकेत मिळतात. पर्यावरणात होणारे बदल अगोदरच पक्ष्यांमध्ये दिसू लागतात, ज्यावरून आपण पर्यावरणीय संकटांचा अंदाज लावू शकतो.
पक्षीतज्ज्ञ यशवंत मस्करे म्हणतात, पक्ष्यांनी निसर्गाच्या सौंदर्यातच नव्हे, तर परिसंस्थेच्या संतुलनातही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांचा गोड आवाज, सुंदर पिसं आणि नाजूक चाल निसर्गाच्या सौंदर्यात भर घालतात, त्याबरोबर पर्यावरणीय संतुलनातही आपला ठसा उमठवतात. म्हणूनच त्यांचं संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर आपण त्यांचं संरक्षण करू शकलो, तर निसर्गाचा हा सुंदर आणि आवश्यक घटक टिकून राहील आणि भविष्यातील पिढ्यांना हा सुंदर अनुभव मिळेल.