शहरातील ‘पाणीबाणी’वर विशेष समिती

पिंपरी – धरण शंभर टक्के भरले. परंतु, पाण्याच्या तक्रारी कायम आहेत. चोवीस तास पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू असताना दोन तास पुरेसे पाणी मिळत नाही. टॅंकर लॉबीसाठी पाणी टंचाई सुरू आहे, अधिकारी नळजोडासाठी पैसे मागतात, व्हॉल्वमॅन पैसे घेऊन काही सोसायट्यांना जास्तीचा पाणी पुरवठा करतात, असे घाणाघाती आरोप आज (बुधवारी) झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केले.

वाढते नागरीकरण आणि पाणी उपसावरील मर्यादा यामुळे पाणी पुरवठ्यात येत असलेल्या अडचणींचा पाढा आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी वाचला. या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार प्रभागनिहाय समान पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी पाणीपुरवठा व जलनिःसारणाची विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश महापौर राहुल जाधव यांनी दिले.

महापौरांचे आदेश : महासभेत सहा तास वादळी चर्चा
पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै आणि ऑगस्ट महिन्याची सभा बुधवारी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. पिंपरी चिंचवड शहरात 9 ऑगस्टपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. यावरून सदस्यांनी तीव्र शब्दात प्रशासनाचा निषेध व्यक्‍त केला. तब्बल सहा तास यावर चर्चा करण्यात आली. सभागृहात उपस्थित 47 नगरसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे पाण्यावरून सत्ताधारी भाजपचे नगरसेवकही हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तर अधिकाऱ्यांना टाकीवरुन फेकणार
भाजपच्या अंबरनाथ कांबळे यांनी प्रभागाला साडेसात एमएलडी पाणी सोडले जात असताना ते मिळत नाही. ते जाते कुठे ? पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना टाकीवरून फेकणार, असा धमकीवजा इशाराच दिला. तर, संदीप वाघेरे यांनी ठेकेदार निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक पाणी पुरवठा विस्कळीत करतो. सगळ्या कामांसाठी एकच ठेकेदार कसा ? आंद्रा, भामा आसखेडचे पाणी आणण्यात विलंब करत असून पवना बंद जलवाहिनी आपल्या चुकीमुळे दहा वर्षे रखडल्याचा आरोपही वाघेरेंनी केला.

“अपयशी ठरलो का?’ घरचा आहेर
सीमा सावळे यांनी पाणी प्रश्‍न गहन झाला असताना प्रशासन ढिम्म झाले असून अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे महापालिकेत सत्ता राबवायला अपयशी ठरलो का, असा संतप्त सवाल केला. तसेच राजू बनसोडे पाण्यामुळे लोक आम्हाला बसू देत नसल्याचे सांगितले. संतोष लोंढे यांनी 24 तास पाणी योजना खड्ड्यात गेल्याचा आरोप केला. अधिकारी, आयुक्तांनी टेंडरमधून बाहेर निघून पाण्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला उषा मुंढे यांनी दिला.

पाणी पुरवठा विभागातच गळती
हर्षल ढोरे म्हणाले, नवीन नळजोड घेण्यासाठी गेली तीन महिने चकरा मारत आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांना अर्ज, विनंती केली. 35 नळजोडासाठी अर्ज केले. मात्र आजतागायत केवळ 15 नळजोड दिले गेले. याबाबत तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पाणी पुरवठा विभागातच कुठेतरी लीकेजेस आहेत. ते आयुक्तांनी शोधून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली.

या व्यतिरिक्‍त माजी महापौर नितीन काळजे, उपमहापौर सचिन चिंचवडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेनेचे राहुल कलाटे, तुषार कामठे, शत्रुघ्न काटे, आशा शेंडगे, सुलक्षणा शिलवंत-धर, संगिता ताम्हाणे, मीनल यादव, प्रवीण भालेकर, अश्‍विनी चिंचवडे, संतोष कोकणे, स्वाती काटे, राजेंद्र गावडे, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, अश्‍विनी जाधव, अर्चना बारणे, वैशाली काळभोर, प्रियंका बारसे, विनोद नढे, बाळासाहेब ओव्हाळ आदींनी प्रशासनावर आगपाखड केली.

सत्ता बदल होताच नियोजन कोलमडले
राजू मिसाळ म्हणाले की, सत्ता बदल झाला आणि पाण्याचे नियोजन कसे बिघडले हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. लोकसंख्या, शहर असे किती वाढले. बंद पाईपलाईन योजना, भामा आसखेड यासारख्या योजनांची अंमलबजावणी अद्यापही कागदावर आहे. 24 बाय 7 योजनेचेही तीन तेरा झाले आहेत. योजनेसाठी संपूर्ण खोदले आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात काय सुरू आहे यावर कोणतेही नियंत्रण नाही. मूलभूत सुविधा नसताना शहर स्मार्ट करून काही फायदा नाही.

अनधिकृत नळजोडांवर कारवाई करा – महापौर
सदस्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी पाणी प्रश्‍नाबाबत येत्या सोमवारी (दि. 26) अधिकारी व नगरसेवकांची विशेष बैठक घेण्याचे जाहीर केले. पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाणी पुरवठा व जलनिःसारण समिती गठित केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. शहरातील अनधिकृत नळजोड शोधून काढा आणि त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश महापौरांनी दिले. सोसायट्यांकडून जादा पैसे घेवून जास्तीचे पाणी सोडणाऱ्या व्हॉल्वमॅनवर कारवाई करा, चोवीस तास पाणी पुरवठ्यासाठी खोदलेले रस्ते न बुजविणाऱ्या ठेकेदारांना “ब्लॅक लिस्टेड’ करावे, असे आदेशही महापौरांनी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.