नवी दिल्ली : पुणे ईसीस मॉड्यूलशी संबंधित मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला 15 ऑगस्टपूर्वी हे मोठे यश मिळाले आहे. ईसिसचा दहशतवादी रिझवान हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मोस्ट वाँटेड यादीत होता. रिझवानवरती तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले होते. याशिवाय अन्य दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग तपासला जात आहे.
दिल्ली-फरिदाबाद सीमेवरून आज(शुक्रवारी) पहाटे रिझवानला शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्यावर यूएपीएअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून रिझवानचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. रिझवान आणि अन्य दोन दहशतवादी मोस्ट वॉन्टेड यादीत होते. त्यापैकी एक शाहनवाजला गतवर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती, तर अब्दुल्ला उर्फ डायपरवाला अद्याप फरार आहे.
रिझवान हा दिल्लीतील दर्यागंजचा रहिवासी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रिझवान हा पुणे ईसीसच्या मॉड्यूलशी संबंधित आहे.रिझवानच्या अटकेसाठी एनआयएने वॉरंट जारी केले होते. पुणे पोलिसांच्या तावडीतून तो पळून गेल्यापासून तो फरारा होता. दिल्ली पोलिसांनी अखेर शुक्रवारी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून काही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, पुणे ईसीस मॉड्यूलच्या अनेक सदस्यांना पुणे पोलीस आणि एनआयएने यापूर्वी अटक केली होती. या वर्षी मार्चमध्ये दहशतवाद विरोधी एजन्सीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात रिझवानच्या नावासह अन्य तीन आरोपींचाही समावेश होता. एनआयएने पुणे ईसीसी मॉड्यूल प्रकरणात एकूण 11 आरोपींवर आरोप ठेवले आहेत.