करोना विषाणूचा उत्परिवर्तित प्रकार ‘अमिक्रॉन’ सध्या जगभरासाठी चिंतेचे कारण ठरला आहे. मूळ करोना विषाणूपेक्षा ‘अमिक्रॉन’मध्ये मोठ्या प्रमाणात बदल आढळून आले असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ‘अमिक्रॉन’च्या स्पाईक प्रोटीनमध्ये ३० बदल झाले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. सध्या वापरात असलेल्या बहुतांश लसी स्पाईक प्रोटीनलाच लक्ष्य करत असल्याने ‘अमिक्रॉन’मध्ये झालेल्या बदलांमुळे त्या विषाणूच्या या प्रकारावर प्रभावी ठरतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अशातच आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पूनावाला यांनी करोना विषाणूचा उत्परिवर्तित प्रकार ‘अमिक्रॉन’वर येत्या सहा महिन्यांमध्ये ‘स्पेशल’ बूस्टर डोस तयार केला जाऊ शकतो अशी माहिती दिली. ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अमिक्रॉन”स्पेशल’ बूस्टर डोसवर काम सुरु देखील केलं असल्याचं सांगितलं.
सध्याची करोना प्रतिबंधक लस ‘अमिक्रॉन’वर कितपत प्रभावी आहे हे क्लिनिकल चाचण्यांतून येत्या २-३ आठवड्यांमध्ये पुढे येईल. या आधारावरच बूस्टर डोसबाबतीतील निर्णय घेतला जाईल असं पूनावाला यांनी सांगितलं.
उत्परिवर्तित ‘अमिक्रॉन’ प्रकारासाठी वेगळी लस द्यावी लागेल अशी शक्यता कमी असल्याचं देखील पूनावाला म्हंटले.
“लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्य्या अभ्यासातून कोव्हीशिल्डच्या परिणामकारकतेची माहिती मिळते. लसीमुळे गंभीर संसर्ग, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज व मृत्यू कमी झाले असल्याचे या अभ्यासातून समोर येते. लस घेतल्यानंतर काही कालावधीने लसीची परिणामकारकता कमी होईलच असे नाही.” असं देखील पूनावाला म्हणाले.