- दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाची सतर्कता
- आरोग्य विभागाला योग्य नियोजनाच्या सूचना
पिंपरी – डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी करोना फैलावाचा वेग कमी व्हावा, या अनुषंगाने ज्या व्यक्तींचा जनसंपर्क जास्त आहे, अशा “सुपर स्प्रेडर’ व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यावर अधिक भर राहणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती सतावत असली, तरी योग्य नियोजन आणि सतर्कता बाळगल्यास करोना विषाणूच्या फैलावावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासन तयारीला लागले असून, आरोग्य विभागाला योग्य नियोजनाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने काही व्यक्तींचा जनसंपर्क अधिक लोकांशी येतो. त्या माध्यमातून कोविड आजाराचा प्रसार अधिक वेगाने होतो. हे अभ्यासातून पुढे आले आहे. दुसऱ्या लाटेत “स्प्रेडर’ व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे लक्षात घेऊन सुपर स्प्रेडरचे विशेष सर्वेक्षण करून, त्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. विविध गटांमधील व्यक्तींचे समूह स्वरूपात सर्वेक्षण तसेच प्रयोगशाळा तपासणी केली जाणार आहे. दैनंदिन प्रयोगशाळा तपासणीमध्ये किमान 50 टक्के नमुने हे या गटातील व्यक्तींचे असणार आहेत. महापालिकेने त्यासाठी वर्गवारीही केली आहे.
कोविड सर्वेक्षण, क्लिनिकल मॅनेजमेंट संदर्भात यापूर्वीच सर्व संबंधितांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नव्याने समोर येणाऱ्या बाबी, क्लिनिकल प्रोटोकॉलमधील बदल यासाठी कार्यक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन: प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी मोठ्या प्रमाणावर रुग्ण हे घरगुती विलगीकरणात आहेत. या रुग्णांचे व्यवस्थापन प्रभावीपणे होण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर पथके कार्यरत राहणार आहेत. सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी त्यातील प्रत्येकाचे सखोल कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आवश्यक आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार निकटवासितांची प्रयोगशाळा तपासणी करण्याचे निर्देश आरोग्य सेवा संचालकांनी दिले आहेत.
हे आहेत “सुपर स्प्रेडर’
किराणा दुकानदार, भाजीवाले, पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते, हॉटेल मालक आणि वेटर्स. दूधवाला, मोलकरीण आणि इतर नोकर, गॅस सिलिंडर वितरण करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिक विषयक कामे, नळजोडणी, दुरुस्ती अशी घरगुती कामे करणाऱ्या व्यक्ती, लॉन्ड्री, पुरोहित, मालवाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पो चालक, रिक्षाचालक तसेच हमाली, रंगकाम, बांधकाम कामगार, पीएमपी ड्रायव्हर, कंडक्टर, सिक्युरिटी गार्ड, अत्यावश्यक सेवेतील शासकीय – निमशासकीय कर्मचारी, पोलीस व होमगार्ड.
प्रशासनाकडून अधिक सतर्कता- आयुक्त
करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून त्या विरोधात लढण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. प्रशासनाकडून अधिक सतर्कता बाळगली जात आहे. नागरिकांनी करोनाची प्राथमिक लक्षणे दिसताच तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.