विशेष लेख – टिक-टॉक मोठी समस्या (भाग १)

महेश कोळी (संगणक अभियंता) 

टिक-टॉक या बहुलोकप्रिय ऍपवर बंदी घालण्याच्या व सशर्त मागे घेण्याच्या निर्णयामुळे काही प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. अशा स्वरूपाची ऍप्स व्यसन जडण्यास कारणीभूत ठरतात, तशीच ती सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर संकटे घेऊन येतात. अशा वेळी सरकार ऍप्सवर अथवा वेबसाइटवर कारवाई करते; परंतु अशी ऍप्स गंभीर सामाजिक समस्या निर्माण करणारी ठरत असून, त्यासाठी कठोर सेन्सॉरशिप, नियमावली आणि ठोस कायद्यांची गरज आहे. 

ती तेथे माती किंवा माकडाच्या हातात कोलीत या म्हणी उगीचच तयार झालेल्या नाहीत. अशा म्हणी अनेक अनुभवांचे सार सांगतात. नवमाध्यमे, सोशल मीडिया आणि टिक-टॉकसारख्या ऍप्लिकेशन्ससाठी या म्हणी चपखल लागू पडतात. संस्कृतमध्येही “अति सर्वत्र वर्जयेत्‌’ असे म्हटले गेले आहे. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि ती ओलांडली तर त्या गोष्टीमधील आनंद संपून जातो; उलट त्या गोष्टीचा त्रासच अधिक होऊ लागतो. स्मार्ट फोन, सोशल मीडिया आणि मनोरंजक ऍप्सचा वापर करणाऱ्यांनी हे वास्तव पक्के ध्यानात घेतले पाहिजे. स्मार्टफोनचे व्यसन लागते आणि ते धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. ऍप्सच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. पब्जी किंवा टिक-टॉक यांसारख्या ऍप्सवर ठिकठिकाणी बंदी घातली जात आहे. ताजे उदाहरण मद्रास उच्च न्यायालयाचे आहे. टिक-टॉक ऍपच्या माध्यमातून पॉर्नोग्राफीला उत्तेजन मिळत असल्याचे कारण देऊन या ऍपवर बंदीची मागणी करण्यात आली होती. विशिष्ट तंत्रज्ञानाच्या साह्याने बनविलेले हे ऍप स्पेशल इफेक्‍ट्‌ससह व्हिडिओ तयार आणि शेअर करण्याची संधी ग्राहकांना देते. केवळ शहरांतच नव्हे तर ग्रामीण भागातही हे ऍप एवढे लोकप्रिय झाले होते की, लाखो फॉलोअर्सना व्हिडिओ शेअर करण्याचे व्यसन अनेकांना जडले होते. केवळ विनोदी संवादच नव्हे तर चित्रपटातील डायलॉग, गाणी, चित्रपटातील सीन, नृत्ये आदी व्हिडिओ टिक-टॉकवर उपलब्ध आहेत.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात हे ऍप आता सार्वत्रिक झाले असल्याचे विधान तमिळनाडूतील एका मंत्र्याने केले होते. त्याच वेळी भाजपच्या एका नेत्याने या ऍपवर बंदी घालायला हवी, अशी भूमिका घेतली होती. तमिळनाडूच नव्हे, तर अनेक ठिकाणी टिक-टॉकवर बंदी घालण्याची मागणी यापूर्वी अनेकदा झाली होती. टिक-टॉकच्या विरोधात झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली. टिक-टॉक ऍपच्या माध्यमातून लहान मुले लैंगिक शोषण करणाऱ्यांच्या संपर्कात येऊ शकतात. टिक-टॉकवरील बरेच व्हिडिओ आणि अन्य सामग्री लहान मुलांना पाहण्याजोगी नसते. त्यामुळेच हे ऍप धोकादायक आहे, असे मत न्यायालयाने नोंदविले होते. लहान मुले या ऍपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात सहजगत्या येतात. त्यानंतर नेमके काय अघटित घडेल हे सांगता येत नाही.
टिक-टॉक ऍपसाठी कन्टेन्ट सेन्सॉरशिपचे नियम कडक नाहीत. त्यामुळे लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम होऊ शकतात. 240 दशलक्ष भारतीयांनी टिक-टॉक डाऊनलोड केले आहे.

अशा लोकप्रिय ऍपवर बंदी घालण्याचे निर्देश देताना न्यायालयाने जी निरीक्षणे नोंदविली, ती पाहता भविष्यात अशा स्वरूपाच्या ऍप्ससाठी कठोर सेन्सॉरशिप लागू करण्याची मागणी निश्‍चितपणे पुढे येईल. परंतु मूलभूत प्रश्‍न तसाच राहतो. तो म्हणजे, एन्टरटेन्मेन्ट ऍप नेहमी इतकी धोकादायक का बनतात? अशा ऍपवर बंदीची मागणी वारंवार का करावी लागते? ही ऍप तयार करणाऱ्यांना समाजातील मूल्यव्यवस्थेशी काही देणेघेणे असते की नाही? त्यांना काही देणेघेणे नसेल तर सरकारला ते का असू नये? अशा ऍप्सना सरकार परवानगी कशी देते? ऍप्सच्या बाबतीत कायमस्वरूपी नियमावली का लागू केली जात नाही? दरवेळी कुणीतरी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आणि न्यायालयाच्या आदेशाने बंदी येणार, असे कुठपर्यंत चालणार? पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, पब-जी, टिक-टॉक अशा असंख्य ऍप्सबाबत अनुभव चांगला नाही. अशी ऍप्स मनोरंजनासाठी असली तरी या ऍप्सचे व्यसन जडलेली माणसे धोकादायक बनतात, विचित्र वागू लागतात. इतर कोणत्याही व्यसनांप्रमाणे हेही एक व्यसनच आहे, हे समजून आणि मान्य करूनच वाटचाल करायला हवी.

व्यसन लावण्याची क्षमता हे अशा स्वरूपाच्या ऍप्सचे वैशिष्ट्य असते. पोकेमॉन गो किंवा पब-जी खेळणाऱ्यांचे व्यसन पराकोटीला पोहोचल्याचे दिसून आले. गेमव्यतिरिक्त दुसरे काहीच दिसत नाही, मागचा-पुढचा विचार करण्याचा विवेक खुंटतो, अशी स्थिती अनेकांच्या बाबतीत निर्माण झाली. हे व्यसन शारीरिक आणि मानसिक पातळीवर माणसाचे नुकसान करणारे ठरते.

टिक-टॉकचाच विचार करायचा झाल्यास केवळ याच ऍपवर नव्हे, तर येथे तयार केलेले व्हिडिओ व्हॉट्‌स ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा अन्य माध्यमांवर शेअर करणे, दिवस-रात्र व्हिडिओ तयार करण्यात रमणे, टिक-टॉक सुपरस्टार बनण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी या ऍपचा वापर करणाऱ्यांसाठी सर्वसाधारण बनल्या. आपल्याच लिस्टमध्ये टिक-टॉकवर बनविलेले व्हिडिओ शेअर करणारे किती लोक आहेत, याचा विचार प्रत्येकाने केला, तरी या व्यसनाची व्याप्ती किती प्रचंड आहे, हे लक्षात येईल.

एकीकडे ही ऍप्स व्यसन म्हणून डोकेदुखी बनत असतानाच दुसरीकडे सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. ज्या-ज्या ऍपविषयी बंदीची मागणी करण्यात आली, त्या सर्व ऍपच्या संदर्भात अनेक खतरनाक किस्से घडले आहेत. पोकेमॉन गो या ऍपचा वापर करणाऱ्या अनेकांचे अपघात झाले. ब्लू व्हेल आणि पब-जी खेळणारी मुले आत्महत्या करू लागली.

विशेष लेख – टिक-टॉक मोठी समस्या (भाग २)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.