विशेष : क्रांतीचे गीत गाणारे अण्णा भाऊ साठे

डॉ. बजरंग कोरडे

अण्णा भाऊ साठे यांच्या लिखाणातून मराठी साहित्यात वेगवेगळ्या पातळ्यावंर क्रांतिकारी बदल घडवून आणले. त्यांच्या लिखाणामुळे मराठी साहित्यात जवळपास पूर्णतः नवे असलेले विषय, आशय, तंत्र, भौगोलिक परिसर, मानवी समूह, त्यांचे जीवन व व्यवहार यांची भर पडली व हे साहित्य समृद्ध होण्यात बहुमोलाचा हातभार लागला.

अण्णा भाऊंच्या उदयापूर्वी मराठी साहित्य हे नागरी भागांत व तिथे राहणाऱ्या मध्यमवर्गाभोवतीच केंद्रित झालेले होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे व संस्कृतीचे पहिले प्रमुख व समर्थ चित्रणकर्ते म्हणून त्यांचा उदय झाला. कारण त्यांना या जीवनाचे व संस्कृतीचे प्रत्यक्ष ज्ञान होते तसेच अनुभवही होता. त्यांनी आपल्या कथाकादंबऱ्यांत, लोकनाट्यांत चित्रित केलेले वातावरण व व्यक्‍तिरेखा या अत्यंत जिवंत, खऱ्याखुऱ्या व सुस्पष्ट वाटतात. 1942 ते 1950 या कालखंडात त्यांनी लोकनाट्य, लावणी, पोवाडे असे वाङ्‌मय प्रकार हाताळले.

या साऱ्या रचना मुख्यतः “लाल बावटा’ कलापथकाच्या माध्यमातून रंगमंचावर सादर करण्यासाठी अन्याय, अत्याचार, विषमता, दैन्य, दारिद्य्र यांच्याबाबतचे लोकप्रबोधन करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध पेटून उठविण्यासाठी, या गोष्टींचा प्रतिकार करण्यास तयार करण्यासाठी थोडक्‍यात, एका नव्या क्रांतीसाठी प्रवृत्त करण्यासाठी वापरण्यात आल्या.

शारीरिक श्रम करणाऱ्या कामगारांना अगदी सहज समजेल अशा भाषेत कार्ल मार्क्‍सची इतिहासाच्या उत्क्रांतीची संकल्पना समजावून सांगणे, सामाजिक बदलाच्या प्रक्रियेमधील कामगारांचे स्थान त्यांच्या मनावर ठसवणे व त्याद्वारे कामगारांमध्ये एक क्रांतिकारी जाणीव निर्माण करणे हा “अकलेची गोष्ट’ (1945) या अण्णा भाऊंच्या लोकनाट्याचा मुख्य उद्देश होता. हे जग कामगारांच्या श्रमामधून तयार झाले आहे व कामगार हाच येथील बदलाचा अग्रदूत आहे असे या लोकनाट्याद्वारे दाखविण्याचा अण्णा भाऊ प्रयत्न करतात.

पुढे 2 मार्च 1958 रोजी महाराष्ट्र दलित साहित्य संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक म्हणून केलेल्या आपल्या भाषणात “हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या/श्रमिकाच्या तळहातावर तरलेली आहे’ असे जे क्रांतिकारक, सुभाषितवजा व सर्वपरिचित विधान अण्णा भाऊंनी केले त्याची पाळेमुळे “अकलेची गोष्ट’ सारख्या लोकनाट्यच्या आशयात व कार्ल मार्क्‍ससारख्या क्रांतीचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या तत्त्ववेत्त्याच्या विचारांत आहेत, हे आपल्या लक्षात येते. (क्रमशः)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.