नवी दिल्ली – येत्या ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली असून ‘दिल्ली’ काबीज करण्यासाठी प्रचार युद्धपातळीवर सुरु आहे. अशातच आज केंद्रीय गृह मंत्री व भाजपचे निवडणूक ‘चाणक्य’ अमित शहा यांनी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विजयाचा शंखनाद’ या कर्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अमित शहा यांनी भाजपच्या सोशल मीडिया टीमचे विशेष गुणगान गायले. ते म्हणाले, “अशा अनेक निवडणुका झाल्या जिथं वाटलं यावेळी काही तरी गफलत होणार मात्र जेव्हा-जेव्हा माझ्या सायबर योध्यांनी लढाई आपल्या हातात घेतली तेव्हा तेव्हा विजय हा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच झाला आहे.”
दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमुख लढत ही सत्ताधारी आम आदमी पक्ष व भारतीय जनता पक्षामध्येच होईल असा अंदाज अनेक राजकीय जाणकारांनी वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष प्रत्यक्ष मैदानाबरोबरच सोशल मीडियावर देखील एकमेकांना जोरदार टक्कर देताना दिसत आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकांचे पडसाद महाराष्ट्रातही
तत्पूर्वी, दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या समर्थकांनी काही दिवसांपूर्वी तान्हाजी चितपटातील एक दृश्य वापरल्याने महाराष्ट्रात चांगलाच वाद पेटला होता. भाजप कार्यकर्त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी एक बनावट व्हिडीओ क्लिप तयार केली होती ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अनुक्रमाने पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांचा चेहरा बसविण्यात आला होता. महाराष्ट्रामध्ये याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला.
Union Home Minister Amit Shah at ‘Jeet Ki Goonj’ program in Delhi: Aise kai chunav aaye jinmein lagta tha ki iss baar maamla fasa hua hai…lekin jab-jab mere cyber yodhao ne ladai ki command sambhali, vijay har baar Narendra Modi aur BJP ki hui hai. pic.twitter.com/RJM7amDnvG
— ANI (@ANI) January 25, 2020