वाघोली : पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथील वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने मुख्य चौकामध्ये नागरिकांना,वाहनचालकांना सूचना देण्यासाठी स्पीकर, भोंगे लावण्यात आले आहेत. स्पीकरद्वारे वाहतूक नियंत्रण केले जात असल्यामुळे समाजसेवक संपत गाडे यांच्या या अभिनव संकल्पनेची वाहतूक कोंडी दूर होण्यास मोलाची मदत होत आहे.
स्पीकरद्वारे माइक वर अनाउन्समेंट करून वाहतूक नियंत्रण करण्याची संकल्पना संपत गाडे व वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून पुढे आल्यानंतर सुरुवातीला केसनंद फाटा चौकात स्पीकर बसविण्यात आले. यामुळे माइकवर स्पीकरद्वारे पोलीस कर्मचारी सूचना देऊन वाहतूक नियंत्रण करू लागले आहेत.
नागरिकांना, वाहनचालकांना सूचना देणे, वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना माइकद्वारे कळवून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी स्पीकरचा उपक्रम मोलाची कामगिरी करत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी मदत होत आहे. यानंतर आव्हाळवाडी फाटा, बकोरी फाटा चौकामध्ये देखील स्पीकर बसविण्यात आले असून त्याद्वारे वाहतूक नियंत्रण केले जात आहे.
लोणीकंद वाहतूक शाखा व समाजसेवक संपत गाडे यांच्या सहकार्यातून भोंग्याद्वारे वाहतूक नियंत्रण ही संकल्पना राबवून वाहतूक नियंत्रण केले जात आहे. वाहतुकीचे नियम नागरिक पाळत असल्याने वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
गजानन जाधव
(सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, लोणीकंद पुणे)