‘ईव्हीएम’ फेरफार प्रकरणी प्रणवदांचे निवडणूक आयोगाला खडे बोल

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांचे निकाल ऐन दोन दिवसांवर येऊन ठेपले असतानाच ईव्हीएम मशीन बाबत संशय व्यक्त केला जात असून यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ट्विटरवर ईव्हीएम मशीन एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी अनधिकृत रित्या नेण्यात येत असल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल झाले असून यावरून विरोधक निवडणूक आयोगावर निशाणा साधत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी निवडणूक आयोगाला सुनावले आहे. ईव्हीएम मशीन्समध्ये फेरफार करण्यात आल्याच्या आरोपावर प्रणव मुखर्जींनी भूमिका मांडली असून त्यांनी या प्रकरणावरील आपलं अधिकृत वक्तव्य ट्विटरद्वारे शेअर केलं आहे.

आपल्या वक्तव्यात ते म्हणतात, “मतदारांनी एव्हीएममध्ये नोंदवलेल्या मतांमध्ये छेडछाड केली जात असल्याचे वृत्त ऐकून मी चिंताग्रस्त आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या ताब्यात असलेल्या ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षिततेची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.

आपल्या देशातील लोकशाहीचे मूळ असलेल्या मतदान प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण होणे ही अस्वीकारहार्य बाब आहे. लोकांनी दिलेलं जनमत हे पवित्र असून या जनमतामध्ये फेरफार केल्याच्या शंकेला वाव राहता काम नये.

माझा भारतातीय संस्थांवर पूर्णपणे विश्वास असून एखाद्या संस्थेमध्ये अधिकारीक जबाबदाऱ्या निभावणारे लोकच ती संस्था कशाप्रकारे काम करेल याचा निर्णय घेत असतात असं माझं ठाम मत आहे.

या आरोपानंतर आयोगाची संस्थात्मक नैतिकता सिद्ध करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असून निवडणूक आयोगाने ईव्हीएमबाबत उपस्थित करण्यात येणाऱ्या शंकांचे पूर्णपणे निरसन करून आपली संस्थात्मक नैतिकता सिद्ध करावी.”

तत्पूर्वी, प्रणव मुखर्जी यांनी लोकसभा निवडणुकांच्या सातव्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर विरोधक निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचे आरोप लावत असताना देखील निवडणूक आयोगाचे कौतुक केले होते. मात्र आता ईव्हीएम फेरफार प्रकरणाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत असल्याने प्रणवदांनी चिंता व्यक्त केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here