मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पुण्यातील पहिली प्रचारसभा बुधवारी अचानक पडलेल्या वादळी पावसामुळे ऐनवेळी रद्द झाली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला होता.
दरम्यान, आज मुंबईतील भांडुप या ठिकाणच्या सभेत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान केलं. मुंबईत राज ठाकरेंच्या गुरुवारी दोन सभा झाल्या या सभांमध्ये राज ठाकरेंनी सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडा असं आवाहन केलं होतं.
राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे –
- आझाद मैदानावर रझाकारांच्या मोर्च्याच्या वेळेस रझाकारांनी पोलिसांवर हात उचलला, त्यावेळेस बाकीचे पक्ष शेपट्या घालून बसले होते, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढला होता आणि पोलिसांवरच्या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता
- नोटबंदीच्या दहाव्या दिवशी मी बोललो होतो की सरकारच्या ह्या निर्णयामुळे उद्योगधंदे बंद पडत जाणार, देशावर बेकारीचं सावट येणार.. आणि तसंच घडलं. बीपीसीएल रिलायन्सला द्यायचा घाट सुरु आहे, आहेत त्या नोकऱ्या जात आहेत, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत, ही वेळ आणली कोणी?
- टोलमुक्त महाराष्ट्र करू असं भाजपचं जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होत? कुठे झाला टोलमुक्त महाराष्ट्र? जे टोल ७८ बंद झाले ते टोल महाराष्ट्र सैनिकांच्या दणक्यामुळे झाले
- ह्या सगळ्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर तर उतरूच पण आपला सक्षम विरोधाचा आवाज विधानसभेत असायला हवा. सरकार वटणीवर आणायची असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा निडर आवाज विधानसभेत हवा.
- मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील २७०० झाडं भर रात्री कापून टाकली, आपल्या संस्कृतीत रात्री आपण झाडाची फुलं काढत नाहीत आणि इथे ह्यांनी झाडांची कत्तल केली. आणि न्यायालय देखील रात्री निर्णय देतं तो देखील राज्य सरकारच्या बाजूने. ह्या सगळ्यावर आवाज कोण उठवणार?
- एल्फिन्स्टनच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आंदोलन केलं त्यामुळे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला.पण पुन्हा तो परिसर सरकारी आशीर्वादाने फेरीवाल्यानी भरले.आंदोलनं आम्ही करायची, सरकार काहीच करणार नाही तरीही माध्यमं मला विचारणार की तुम्ही आंदोलनं अर्धवट सोडता?
- गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण सरकारला त्याचं काही नाही, अमित शाह तर महाराष्ट्रातल्या एका सभेत बोलत होते आणि त्या सभेच्या शेजारच्या गावात त्याच वेळेला एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि अमित शाह बोलत होते कलम ३७० बद्दल.