माद्रिद – स्पेनमध्ये अखेर इच्छामरणाला मान्यता देण्यात आली असून याबाबतच्या विधेयकाला गुरुवारी देशाच्या संसदेत मंजुरी देण्यात आली. दीर्घकाळ आजारी असलेले रुग्ण किंवा सहन न होणारी व्याधी असणारे रुग्ण आता डॉक्टरांच्या सहकार्याने आपले जीवन संपवू शकतील.
संसदेत या विधेयकाच्या बाजूने 198 आणि विरोधात 138 मते मिळाली. अर्थात स्पेनच्या वरिष्ठ सभागृहाची मान्यता गरजेची आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर तो कायदा सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यांनी या कायद्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
स्पेनचे आरोग्यमंत्री साल्वाडोर आला यांनी या कायद्याचे समर्थन करताना सांगितले समाजाचा घटक म्हणून आपण अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांचे हाल पाहू शकत नाही म्हणूनच आम्ही हा कायदा केला आहे. आता डॉक्टरांच्या सहकार्याने आणि सल्ल्याने रुग्ण आपले जीवन संपवू शकतील आणि त्यांची वेदनेतून मुक्ती होईल.
यापूर्वी पोर्तुगालने असाच कायदा केला आहे, तर बेल्जियम कॅनडा कोलंबिया लक्सेम्बर्ग, नेदर्लंड्स या देशातही इच्छामरणाला कायदेशीर मान्यता आहे.