माद्रिद – सर्गियो रोमोस व करिम बेन्झेमा यांनी केलेल्या अफलातून गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने रिअल सोसिएदाद संघाचा 2-1 असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर रेयाल माद्रिदने स्पर्धेतील आगेकूच कायम राखली आहे.
सामन्याला सुरुवात झाल्यानंतर पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटला. दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर सर्गियो रोमोसने 50 मिनिटाला अप्रतिम फिल्ड गोल करत रेयालला आघाडी मिळवून दिली. यावेळी रेयालने रिअल सोसिएदाद संघाचा बचाव भेदला. त्यानंतर करीम बेन्झेमाने 70 व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. हा सामना रेयालकडे झुकलेला होता. मात्र, त्यानंतर मायकल मेरिनो याने 83 व्या मिनिटाला गोल करत रिअल सोसिएदाद संघाच्या आशा वाढवल्या होत्या. यानंतरही सामन्याची काही मिनिटे बाकी होती. रिअल सोसिएदादच्या खेळाडूंनी वेगवान व आक्रमक चालीही रचल्या पण त्यांना रेयाल माद्रिदचा बचाव भेदता आला नाही. अखेर हा सामना रेयाल माद्रिदने 2-1 असा जिंकला.
करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा साखळीतील काही सामने खेळविल्यानंतर लांबणीवर टाकण्यात आली होती. गेल्या आठवड्यात स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात झाल्यानंतर बार्सिलोना व रेयाल माद्रिद यांच्यातच गटवारीत आघाडी घेण्याची चुरस निर्माण झाली होती. बार्सिलोनाने यात वर्चस्व राखताना स्पर्धेच्या विजेतेपदाची दावेदारीही सिद्ध केली होती.
मात्र, सोमवारच्या सामन्यातील विजयामुळे रेयाल माद्रिदने थेट बार्सिलोनाला पिछाडीवर टाकत गटवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. या स्पर्धेच्या इतिहासात रेयालने प्रथमच बार्सिलोनाला गटवारीत मागे टाकले आहे. या दोन्ही संघांचे गटवारीतील गुण 65 असले तरीही रेयालने गोलसंख्येच्या बाबतीत त्यांना मागे टाकत अग्रस्थान पटकावले आहे.