माद्रिद : स्पेनच्या संसदेने महिलांसाठी एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता स्पेनमध्ये महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी घेता येणार आहे. या या काळात महिलांना पगारी रजा मंजूर करण्यात येणार आहे. असा निर्णय घेणारा स्पेन हा पहिला युरोपियन देश ठरला आहे.
स्पेनमध्ये करण्यात आलेल्या या कायद्याला संसदेत एकूण 185 मतांपैकी 154 मते मिळाली आहेत. बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती सरकारने केली आहे. सध्या काही निवडक देशांमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी दिली जाते. सुट्टी देणाऱ्या देशांमध्ये जपान, इंडोनेशिया आणि झांबिया या देशांचा समावेश आहे. त्यातच मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देणाऱ्या देशांपैकी आता स्पेन हा एक बनला आहे.
स्त्रियांच्या आरोग्यांच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचे मंत्री इरेन मोंटेरो यांनी म्हटले आहे. या कायद्याने महिलांना मासिक पाळीत पगारी रजा देण्याचा अधिकार दिला असल्याचे मंत्री इरेन मोंटेरो यांनी सांगितले आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना आजारी रजा लागू करण्याचा अधिकार असणार आहे.
स्पॅनिश सोसायटी ऑफ गायनॅकॉलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्सच्या मते, मासिक पाळीमध्ये सुमारे एक तृतीयांश महिलांना तीव्र वेदना होतात. दरम्यान, मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देण्याच्या निर्णयाला काही संघटनांनी विरोध देखील केला आहे. UGT या स्पेनच्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेने या कायद्याला विरोध केला आहे. हा कायदा कामाच्या ठिकाणी महिलांना कलंकित करू शकतो असे या संघटनेने म्हटले आहे.
मासिक पाळीदरम्यान महिन्याच्या त्या चार पाच दिवसांमध्ये महिलांना तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. अनेकदा या वेदनांमुळे त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होतो. मासिक पाळीतील होणाऱ्या वेदनांमुळे महिलांना मासिक पाळीची सुट्टी देण्याचा निर्णय स्पेनने घेतला आहे.