पुणे, दि. 2 – साडेतीन मुहुर्तापैकी संपूर्ण एक असलेल्या दसरा (दि. 5) अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना उत्पादीत केलेली फुले कोणत्याही शुल्काशिवाय विकण्याची उभा बाजार समितीने उपलब्ध करून दिली आहे. यास “फूल महोत्सव’ संबोधण्यात येत आहे. फळ-भाजीपाला विभागाच्या समोरील बाजूस जेथे ट्रक पार्किंग केल्या जातात. तेथिल जागा शेतकऱ्यांना फुले विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.
यावेळी तरकारी विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे उपस्थित होते. विशेष म्हणजे या जागेत शेतकरी नसलेल्या व्यक्तींनाही माल विक्रीची मुभा देण्यात आली आहे. त्यांच्याकडून दिवसाला एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर, बाजारातील आडतेही तेथे विक्री करू शकतात. त्यांना नियमाप्रमाणे सेस भरावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दसऱ्याला झेंडू, शेवंतीसह विविध फुलांना मागणी जास्त असते. दरवेळी शेतकरी शिवनेरी रस्ता, भुसार बाजारात गाड्या लाऊन माल विकत असतात. त्यामुळे शिवनेरी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असते. मात्र, यावेळी ही कोंडी होऊ नये, याची काळजी बाजार समितीकडून घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ट्रक पार्किंगच्या ठिकाणी फूल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे गाडीतून विक्री करावी लागणार आहे. बाजार इतर कोणत्याही ठिकाणी विक्री करता येणार नाही. नेहमीच्या फूल बाजाराच्या ठिकाणी आडत्यांकडून पारंपरिक पद्धतीने व्यापार सुरू राहणार आहे. बाजार समितीच्या सात क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळची जागा दसऱ्यापर्यंत ट्रक पार्किंगसाठी वापरण्यात येणार आहे. तेथे ट्रक उभे करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दसऱ्यामुळे शेतकऱ्यांना फुले विक्रीसाठी कोणत्याही शुल्काशिवाय जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी फुलाच्या पिकाची नोंद असलेला सात-बारा उतारा आणि आधारकार्ड देणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
– मधुकांत गरड, प्रशासक, बाजार समिती