लखनौ – सपा नेते आझम खान यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. ते उत्तर प्रदेश विधानसभेत शपथ घेऊ शकणार नाहीत. सीतापूर कारागृह प्रशासनाने आझम खान यांना शपथ घेण्याची परवानगी देण्यासाठी याचिका दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली आहे. मात्र, खुद्द आझम यांची आज जाण्याची इच्छा नसल्याचेही बोलले जात आहे.
आझम खान हे मानहानीसह विविध गुन्ह्याअंतर्गत अडीच वर्षांपासून तुरूंगात आहेत. त्यांनी तुरूंगातूनच रामपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले. पण त्यांना आमदारकीची शपथ घेता येणार नाही.
न्यायालयाने त्यांना आमदार पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेण्यासाठी विधानसभेत जाण्यास परवानगी नाकारली आहे. ते लोकसभेचे खासदार होते, त्यांनी नुकताच राजीनामा दिला होता. यूपीमध्ये विजयी झालेल्या सर्व आमदारांसह त्यांना शपथविधीसाठी विधानभवनात जायचे होते, मात्र त्यांना जामीन मिळाला नाही.
राज्यातील सर्व विजयी आमदारांना सोमवार आणि मंगळवारी शपथ दिली जात आहे, परंतु न्यायालयाची परवानगी नसल्यामुळे आझम खान शपथ घेऊ शकणार नाहीत. सोमवारी विधानसभेत 348 आमदारांनी शपथ घेतली.
मंगळवारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश कुमार खन्ना आणि इतर आमदारांनी शपथ घेतली. सुरेश खन्ना यांच्याकडे अर्थ आणि संसदीय कामकाज मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अब्दुल्ला आझम आणि अब्बास अन्सारी यांनीही मंगळवारीच शपथ घेतली.