होय सोरायसिस बरा होऊ शकतो! भाग ४ (पथ्यपालन)

डॉ. जयदीप महाजन
दर वर्षी ऑगस्ट महिना हा जागतिक पातळीवर सोरायसिस जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. सोरायसिस हा संसर्गजन्य आजार नाही, पण या आजारात त्वचेवर निर्माण होणारे चट्टे रुग्णांच्या भावनांवर, वागणुकीवर परिणाम करतात. अशा वेळी सकारात्मकवृत्तीनं या आजारावर उपचार घेतल्यास नक्की बरं होता येतं. फक्त संयम आणि काळजी महत्त्वाची असते. 
खाण्याचे कोणते प्रकार टाळावेत? 
योग्य प्रकारे आणि योग्य पद्धतीचे पदार्थ न खाल्ल्यास सोरायसिस हा आजार डोकं वर काढतो.
आहारात जास्त खारट (लोणचं, पापड, चिवडा, वेफर्स, फरसाण, खारेदाणे, खारवलेला सुकामेवा इ.), आंबट (चिंच, टॉमेटो, लिंबू, आमचूर, कैरी, दही, आंबट ताक, आंबट पेय, आंबवलेले पदार्थ इ.), अतिशय गोड चवीचे पदार्थ असणं.
खाण्याचा सोडा किंवा इतर क्षार शिळे पदार्थ खाणं
चहात बिस्किटं, पोळी-चपाती बुडवून खाणं
दूध आणि फळं एकत्र करून केलेले पदार्थ
दूध आणि माशांचे पदार्थ एकाच वेळी खाणं
शरद ऋतूत विरेचन घेऊन शरीर स्वच्छ केले पाहिजे. अन्यथा काही व्यक्तींना मंडलकुष्ठासारखा सोरायसिसचा विकार जडू शकतो
रात्री जागरण करणं आणि दिवसा झोपणं. तेही जेवल्यावर लगेच टाळावं
जेवल्यावर लगेच व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीची कामं करणं.
उन्हातून एकदम एसीत जाणं किंवा एसीतून एकदम उन्हात जाणं.
पथ्यपालन 
कॉर्टिकोस्टेरॉइड सारख्या औषधाने या आजारात गुण येतो. परंतु यांचा उपयोग जाणकार डॉक्‍टरांच्या सल्ल्याने केला पाहिजे. कारण या औषधाचा चुकीचा किंवा अतिप्रमाणात वापर धोकादायक असतो. त्यांचा वैद्यकीय निरीक्षणाखाली वापर करून व्याधी आटोक्‍यात आणणं उत्तम.
परंतु काही वैद्य पैशांच्या लोभापायी चुर्णात या औषधाच्या गोळ्या कुटून एकजीव करून रोग्यांना देतात. अशा भामट्यांपासून सावध राहावं.
औषधोपचार
काही जणांच्या मते समुद्रस्नान (समुद्रात आंघोळ करणे) किंवा सूर्यरश्‍मी चिकित्सा (उन्हात बसणं) केल्याने हा रोग कमी होतो. याचा निश्‍चित उपयोग होतो की नाही, याबद्दल वाद आहेत. या विकारात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे तेल लावून त्वचा तेलकट ठेवणं महत्त्वाचं असतं. कफ आणि वात दोष बिघडून हा विकार झाला असल्यास कोवळ्या उन्हात सकाळी बसल्याने हा विकार बरा होण्यास मदत होते; परंतु ज्या प्रकारात त्वचा लाल होऊन त्यावर पापुद्रे असतात, तेव्हा मात्र समुद्रस्नान किंवा सूर्यरश्‍मी चिकित्सा त्रासदायक ठरू शकते. सोरायसिसच्या आजारात तेलाचं मालिश अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण तेलामुळे कफ तर वाढत नाही. पुन्हा वाताचं शमन होतं.
शिवाय त्वचेवर तेलाचा थर आल्यामुळे तिला भेगा पडत नाही. पापुद्रे सहज सुटतात. तेलामुळे त्वचा नरम पडल्यामुळे खाज येत नाही. खोबरेल तेलाचा वापर केल्यास चालते; परंतु वैद्यांच्या सल्ल्याने विशिष्ट तेलाचा वापर केल्यास ते अधिक उपयुक्त ठरतं. महातिक्तघृत, यष्टीमधुघृत यांसारखी तुपात बनवलेली औषधं घेण्याचा सल्ला वैद्यराज देतात.आरोग्यवर्धिनी, महागंधक रसायन, चोपचिन्यादी चूर्ण, सु. सूतशेखर, मौक्तिक कामदुधा, गुळवेल, ज्येष्ठमध, सारिवा, मंजिष्ठा यांसारखी औषधंही या आजारात उपयुक्त असतात, पण कोणती औषधं वापरावीत यासाठी निश्‍चितच तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणं आवश्‍यक असतं.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)